जनावरांची २४ हजार किलो कातडी जप्त
By admin | Published: October 17, 2015 03:06 AM2015-10-17T03:06:05+5:302015-10-17T03:06:05+5:30
नाशिकहून तामिळनाडूमध्ये मृत जनावरांची २४ हजार किलो कातडी घेऊन जाणारा ट्रक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री पकडला.
नाशिक रोड : नाशिकहून तामिळनाडूमध्ये मृत जनावरांची २४ हजार किलो कातडी घेऊन जाणारा ट्रक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री पकडला. सात जणांना अटक केली असून नाशिकच्या तीन व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री दत्तमंदिर सिग्नल परिसरात सापळा रचला होता. पोलिसांनी द्वारका परिसरात ट्रक अडवला. त्यामधून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी चालकाला विचारणा केल्यानंतर ट्रकमध्ये मृत बैल आणि म्हशीचे कातडे असल्याचे सांगितले. मात्र जनावरांच्या कातड्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व मृत जनावरे वाहून नेण्याचा त्याच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले.
ट्रकचालक जयराम व्ही. वीरप्पन, पलानी मुत्तुस्वामी, सय्यद मोहम्मद इदायत तुल्ला ऊर्फ अबू तायर (सर्व रा. तामिळनाडू) व नाशिकचे जुबेर बिसमिल्ला खान, अब्दुल बारी अब्दुल कयुम, सईद अजीज खान यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सातही जणांना अटक करण्यात आली आहे.