२४२ बांगलादेशी घुसखोरांना अटक
By admin | Published: April 23, 2015 06:07 AM2015-04-23T06:07:04+5:302015-04-23T06:07:04+5:30
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बांगलादेशींची घुसखोरी वाढली असून जानेवारी २०१५ पर्यंत मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात ठाण मांडणाऱ्या २४२ बांगलादेशी
डिप्पी वांकाणी, मुंबई
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बांगलादेशींची घुसखोरी वाढली असून जानेवारी २०१५ पर्यंत मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात ठाण मांडणाऱ्या २४२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. मागच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकांमुळे सीमावर्ती भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात येऊनही बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केलीच. २०१४ मध्ये एकट्या मुंबईत ४१८ बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. यापैकी २८६ जणांना माघारी पाठविण्यात आले होते.
सार्वत्रिक निवडणुकांमुळे सीमावर्ती भागात कडेकोट नाकाबंदी करण्यात आल्याने फारशी घुसखोरी झाली नाही; परंतु यावर्षी बांगलादेशींचे घुसखोरींचे प्रमाण वाढल्याचे दिसते. मीरा रोड, ठाणे, मुंब्रा आदी भागांत ठाण मांडून हे बांगलादेशी मिळेल ते काम करतात, असे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बांगलादेशी नागरिकांना भारतात मुक्तप्रवेश देण्यात सीमा सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. एक ते दोन हजार रुपयांच्या मोबदल्यात बांगलादेशी नागरिकांना खुशाल भारतीय हद्दीत प्रवेश दिला जातो. भारताच्या विविध भागांत हे नागरिक काम करून भरपूर पैसा कमावतात. पुरेशी कमाई झाल्यानंतर ते या पैशातून गावी घर बांधण्यासाठीआपापल्या गावी परतात, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
बांगलादेशी भारतीयांसारखेच दिसत असल्याने त्यांना हुडकणे कठीण आहे. एवढेच नाही तर यापैकी काही महाभाग अधिकाऱ्यांना लाच देऊन प. बंगालमधील मतदार ओळखपत्रही मिळवितात. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण असते. दहशतवादी संघटना कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. अलीकडेच मुंबईतील ९६ पोलीस ठाण्यांत दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बांगलादेशींंचा माग कसा काढायचा, याचे आठवडाभराचे प्रशिक्षण देण्यात येते. झोपडपट्टी भागात जाऊन तेथील लोकांकडून बांगलादेशींची माहिती घेण्याचेही कसब पोलिसांना शिकविले जाते.