विजेच्या मागणीत २५ टक्क्यांनी वाढ; उन्हाळ्यामुळे मागणी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:17 AM2021-05-10T07:17:20+5:302021-05-10T07:18:13+5:30
मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात एकूण वीजवापर २६.४ अब्ज युनिट होता. यावरून औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेची मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही देशातील विजेची मागणी गेल्या महिन्यात वाढली आहे. मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात एकूण वीजवापर २६.४ अब्ज युनिट होता. यावरून औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेची मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
वीज मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात २१.०५ अब्ज युनिट एवढा वापर होता. त्यात यावर्षी तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी संपूर्ण मे महिन्यात १०२.०८ अब्ज युनिट एवढा वीजवापर होता. यावर्षी ६ मे रोजी १ लाख ६८ हजार ७८० मेगावॅट एवढी सर्वाधिक मागणी नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
एप्रिलमध्येही विजेची मागणी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढून १ लाख १९ हजार २७० मेगावॅट एवढी नोंदविण्यात आली होती. तर गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये विजेची मागणी ८४ हजार ५५० मेगावॅटपर्यंत घटली होती.
कशामुळे वाढ...
यावर्षी वीजवापर वाढण्यासोबतच तुलनात्मक आधारामध्ये तफावत आल्यामुळे आकडेवारीमध्ये मोठा फरक दिसत आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये मे महिन्यात लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लावण्यात आले. तरीही वीजवापरात वाढ झाली आहे. औद्योगिकसह उन्हाळ्यामुळे घरगुती वीजवापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, बहुतांश निर्बंध हे एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात लावण्यात आले.