भोंदूबाबाने २५ कोटींना गंडविले, दौंडमध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:33 AM2017-08-12T02:33:31+5:302017-08-12T02:33:39+5:30
श्रीगोंदा-कर्जत (जि. अहमदनगर) या दोन गावांतील शेतकऱ्यांना गुप्तधन काढण्याच्या आमिषाने २५ कोटींच्या रुपयांना गंडा घालणारा भोंदूबाबा अब्दुल जावेद अब्दुल समी (वय ४८, रा. जिनसी चौक, जहांगिराबाद, भोपाळ, मध्य प्रदेश) याच्यासह त्याचा दौंडमधील साथीदार भारत धिंडोरे (वय ४२, रेल्वे सफाई कर्मचारी) या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : श्रीगोंदा-कर्जत (जि. अहमदनगर) या दोन गावांतील शेतकऱ्यांना गुप्तधन काढण्याच्या आमिषाने २५ कोटींच्या रुपयांना गंडा घालणारा भोंदूबाबा अब्दुल जावेद अब्दुल समी (वय ४८, रा. जिनसी चौक, जहांगिराबाद, भोपाळ, मध्य प्रदेश) याच्यासह त्याचा दौंडमधील साथीदार भारत धिंडोरे (वय ४२, रेल्वे सफाई कर्मचारी) या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
आरोपी अब्दुल जावेद अब्दुल समी आणि भारत धिंडोरे या दोघांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांत फसवणुकीची तक्रार बाळू पवार (वय ४५, रा. भांडेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी दाखल केली आहे. श्रीगोंदा आणि कर्जत येथील फसवणूक झालेले शेतकरी या भोंदूबाबाच्या नादाला लागल्याने जमिनी विकून कंगाल झाले आहेत. तर, फसवणूक झालेल्या कर्जत येथील एका शेतकºयाला त्याच्या कुटुंबीयांनी घरातून हाकलून दिले आहे.
श्रीगोंद्याच्या एका शेतकºयाला भोंदूबाबाने फसविले होते. त्यानंतर या शेतकºयाने उरलेले २५ लाख रुपये देतो, म्हणून भोंदूबाबाला कळविले आणि तो येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार भोपाळ येथून २५ लाख रुपये घेण्यासाठी भोंदूबाबा श्रीगोंद्याला आला. दरम्यान दौंड येथील भारत धिंडोरे यांच्या घरी तो मुक्कामाला राहिला. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सापळा रचून भोंदूबाबासह त्याचा साथीदार धिंडोरे याला ताब्यात घेतले आहे.
एखाद्या शेतकºयाला गाठायचे आणि त्याला, ‘तुझ्या घरातील किंवा शेतातील धन काढून देतो,’ असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला जायचा. धन काढून देण्यासाठी होकार मिळताच ‘तुमच्या शेतात किंवा घरात धन आहे की नाही, हे पाहण्यासाठी फक्त ११ हजार रुपयांची पूजा करावी लागेल. तुमच्या घरापासून दूरवर एक मोठा चौकोनी खड्डा खोदावा लागेल व तो शेणाने लिंपावा लागेल,’ असे बाबा सांगत असे. त्यानुसार संबंधित शेतकरी शेतात खड्डा खोदायचा. रात्री साडेआठच्या सुमारास अंधार पडल्यानंतर घरातील सर्व मंडळींना पूजा करण्यामध्ये दंग केले जायचे. दरम्यान, भोंदूबाबाचा हस्तक खोदलेल्या खड्ड्यात एक साप, फडक्याने तोंड बांधलेला हंडा ठेवायचा. या सर्व वस्तू ठेवून झाल्यानंतर हा हस्तक बाबाला वस्तू ठेवल्याची माहिती मोबाईलवरून देत असे आणि त्यानंतर खड्ड्यापासून फरार व्हायचा. नंतर भोंदूबाबा संबंधित शेतकºयाला खड्डा पाहण्यासाठी घेऊन जायचा. खड्ड्यात साप आणि हंडा पाहिल्यानंतर शेतकरी अंचबित व्हायचा आणि भोंदूबाबा हाताने साप पकडून पिशवीत टाकायचा. शेतकºयाला हंडा उचलायला लावून तो हंडा त्याच्या घरात आणला जायचा. हंड्याची पूजा झाल्यानंतर त्यातून एक सोन्याचा तुकडा भोंदू बाबा काढायचा. याने संबंधित शेतकºयाचा बाबावर विश्वास बसायचा. बळी पडलेले शेतकरी असे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले जायचे. ‘हंड्याची पूजा १५ दिवसांनी करू,’ असे बाबा सांगायचा. ‘परस्पर हंड्याला कोणी हात लावला तर तो जागीच मरेल,’ असा इशाराही देऊन भोंदूबाबा तेथून निघून जायचा. १५ दिवसांनंतर पुन्हा त्या शेतकºयाच्या घरात हंड्याची पूजा सुरू व्हायची. ‘या धनावर १२ आत्मे आहेत. त्यांची शांती करण्यासाठी घरातील एका व्यक्तीचा बळी द्यावा लागेल.’ असे तो सांगायचा. यावर संबंधित शेतकरी घाबरायचा. ‘आम्ही बळी देऊ शकत नाही,’ असे स्पष्टपणे सांगिल्यानंतर ‘यावर पर्यायी मार्ग आहे. बळी न देता आत्म्याचा हिस्सा ५ ते २५ लाखांपर्यंत द्यावा लागेल आणि तो हिस्सा मी न घेता पाण्यात सोडावा लागेल.’
बळी पडलेल्या शेतकºयांनी हिस्सा दिल्यानंतर ते पैसे एका पिशवीत ठेवले जात. मात्र, हातचलाखीने ही पिशवी बदलून त्यात कागदाचे बंडल ठेवले जायचे आणि कागदाच्या बंडलची पिशवी संबंधित शेतकºयाच्या हातात देऊन ती काशी, गया, अजमेर येथील नदीत सोडायला सांगितले जायचे. त्यानुसार कर्जत येथील काही शेतकºयांनी श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे भीमा नदीत बनावट पिशवीतून २५ लाख रुपयांच्या नोटांच्या आकाराचे कागदी बंडल करून पाण्यात सोडून दिले आहेत.
दरम्यान, १२ आत्म्यांची शांती करायची म्हणून ५ ते २५ लाख रुपये शेतकºयाकडून उकळले जायचे. साधारणत: चार ते पाच कोटी रुपयांपर्यंत या शेतकºयांना गंडा घातला असल्याची माहिती पुढे
आली आहे.
३ लाखांना अत्तराची बाटली
जाळ्यात सापडलेल्या कर्जत येथील एका शेतकऱ्यांला भोंदूबाबाने सांगितले, की ‘तुला २६ दिवस अत्तराचा दिवा लावावा लागेल. त्यासाठी ७ बाटल्या अत्तर घ्यावे लागेल.’ एका बाटलीची किंमत ३ लाख रुपये, असे २१ लाख रुपये संबंधित शेतकºयाने भोंदूबाबाला देऊन घरात अत्तराचा दिवा लावला.
काही जाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना ‘अजमेर येथून बकऱ्यां घ्याव्या लागतील आणि त्यांच्यावर मंत्र मारावा लागेल,’ असे सांगून हा भोंदूबाबा बकऱ्यां घेण्यासाठी अजमेरला घेऊन जायचा. भोंदूबाबाच्या साथीदारांकडून बकऱ्यां विकत घेतल्या जायच्या आणि त्या तेथेच सोडून दिल्या जायच्या.