सप्तशृंगगड विकासासाठी २५ कोटी, मुख्यमंत्र्यांची घोषणा, फ्युनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:37 AM2018-07-03T00:37:37+5:302018-07-03T00:37:46+5:30
वणीच्या सप्तशृंग गडावरील शक्तिपीठाकडे जाण्याकरिता तयार करण्यात आलेल्या देशातील पहिल्याच फ्युनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कळवण (जि. नाशिक) : वणीच्या सप्तशृंग गडावरील शक्तिपीठाकडे जाण्याकरिता तयार करण्यात आलेल्या देशातील पहिल्याच फ्युनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या वेळी सप्तशृंग गड विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.
उद्घाटनानंतर ट्रॉलीतून प्रवास करत मुख्यमंत्र्यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आदी उपस्थित होते.
फिरत्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन
ग्रामीण पोलीस दलातील गस्ती पथकांसाठी जीपीएस प्रणालीसह सुसज्ज वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पथकाच्या साहाय्याने नाशिक जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
सोमवारी ओझर विमानतळावर
या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला़
‘मांजरपाडाचे पाणी राज्यातच वाहू द्या’
आता नाशिकचा बोट प्रकल्पही पालकमंत्र्यांनी हाती घ्यावा. मांजरपाडा प्रकल्पाचे उर्वरित कामही मार्गी लावत त्याचे उद्घाटनही तुम्हीच करा, असा उपरोधिक टोला या वेळी भुजबळांनी लगावला. मांजरपाडाचे पाणी कुणीही घ्या, मात्र ते महाराष्ट्रातच वाहू द्या, असेही ते म्हणाले.