करमणूक कर थकबाकी २५ कोटींवर
By admin | Published: July 8, 2014 01:18 AM2014-07-08T01:18:37+5:302014-07-08T01:18:37+5:30
करमणूक कर कोणी भरावा या मुद्यावरून एमएसओ (मल्टी सिस्टीम आॅपरेटर)आणि स्थानिक केबल आॅपरेटर यांच्यातील वादाचा फटका जिल्हा प्रशासनाला बसला असून संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडे कर
ग्राहकांकडून वसूल: सरकारला देण्यास ना
नागपूर: करमणूक कर कोणी भरावा या मुद्यावरून एमएसओ (मल्टी सिस्टीम आॅपरेटर)आणि स्थानिक केबल आॅपरेटर यांच्यातील वादाचा फटका जिल्हा प्रशासनाला बसला असून संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडे कर भरणेच बंद केल्याने थकबाकी २५ कोटींवर गेली आहे.
केबल ग्राहकांकडून ४५ रुपये प्रति महिना करमणूक कराची आकारणी स्थानिक केबल आॅपरेटर करतो. गेल्या अनेक महिन्यांपासून ही वसुली नियमित सुरू असताना प्रत्यक्षात हा कर सरकारजमा केला जात नाही. स्थानिक केबल आॅपरेटरने हा कर जमा करावा की एमएसओंनी जमा करावा या मुद्यावर वाद आहे. मार्च २०१४ मध्ये राज्य शासनाने यासंदर्भात जी.आर. काढून एमएसओंवर ही जबाबदारी टाकली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कर भरण्याचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. सध्या ही रक्कम २५ कोटींवर गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूरमध्ये स्थानिक केबल आयोजकांची संख्या ६७० आहे. मे २०१४ अखेरपर्यंत केबल जोडण्यांची संख्या ४ लाख ९९ हजार होती. मे २०१४ अखेरपर्यंत त्यांच्याकडून फक्त ५.२६ लाख रुपयेच वसुल होऊ शकले. कराचा दर आणि केबल जोडणीधारकांची संख्या लक्षात घेता दर महिन्याला करमणूक करापोटी सव्वा दोन कोटी रुपये जमा व्हायला हवेत. हे येथे उल्लेखनीय.
करमणूक कर वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले. सर्व संबंधितांना नोटीस पाठविल्या. त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली. काही केबल आॅपरेटर्सवर कारवाईसुद्धा झाली. मात्र तरीही तोडगा निघाला नाही.
वाढती थकबाकी लक्षात घेऊन अलीकडेच अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी एमएसओंजी बैठक घेतली.
यात कर वसुलीबाबत चर्चा करण्यात आली. कर कोणी भरावा हा मुद्दा पुन्हा या बैठकीत चर्चेला आला. शासनाच्या नियमाप्रमाणे करवसुली करून ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करावी, असी सूचना यावेळी एमएसओंना देण्यात आली.
यासाठी काही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही कर जमा झाला नाही तर प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)