साखर कारखान्याचे २५ कोटी हडप
By admin | Published: August 6, 2015 01:16 AM2015-08-06T01:16:46+5:302015-08-06T01:16:46+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातून औरंगाबादच्या मे. मैत्री शुगर अँड ट्रेडिंग कंपनीला ३० कोटी रुपये देण्यात आले. त्यातील २५ कोटी रुपये हे महामंडळातील ३८५ कोटी
यदु जोशी , मुंबई
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातून औरंगाबादच्या मे. मैत्री शुगर अँड ट्रेडिंग कंपनीला ३० कोटी रुपये देण्यात आले. त्यातील २५ कोटी रुपये हे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम संचालक असलेल्या कोमराल (हबटाऊन) कंपनीच्या खात्यात वळविण्यात आले. उर्वरित ५ कोटी रुपयांत मैत्री शुगर कंपनी खरेदी करण्यात आली. रमेश कदमने बँक आॅफ महाराष्ट्रच्या बोरीवली शाखेत असलेल्या महामंडळाच्या खात्यातून ३० कोटी रुपये आरटीजीएसने मैत्री शुगरच्या खात्यात टाकले. प्रत्यक्षात ही रक्कम औरंगाबाद येथील अमरदीपसिंग यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात जमा झाले. या रकमेतून मैत्री शुगर कंपनीने परसोंडा, ता.वैजापूर येथील विनायक सहकारी साखर कारखाना विकत घेणे अपेक्षित होते पण घडले भलतेच.
३० कोटींपैकी २५ कोटी रुपये हे कोमराल (हबटाऊन) कंपनीच्या कॅनरा बँकेतील खात्यात जमा करण्यात आले आणि कदमने २० मार्च २०१५ रोजी त्याचे निकटवर्तीय कमलाकर ताकवाले आणि रामेश्वर गाडेकरच्या नावे ५ कोटी रुपयांत मैत्री शुगर कंपनी विकत घेतल्याचे दाखविले. सगळाच व्यवहार अनाकलनीय होता.
आणखी एक धक्कादायक प्रकरण हे औरंगाबादमधील जमीन खरेदीचे आहे. मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपये रमेश कदमने महामंडळातून उचलले. या जमिनीचा व्यवहार होण्याआधीच १० कोटी ७५ लाख रुपये हे जमिनीचे मालक कोहली यांच्या कॅनरा बँकेतील खात्यात जमा केले.
जमिनीच्या नोंदणी खर्चापोटी ६५ लाख ७५ हजार रुपये हे
महेंद्र एंटरप्रायजेसच्या (मालक कोहली) मलकापूर अर्बन बँकेत
जमा करण्यात आले. फतेपूर; औरंगाबाद येथे २० गुंठे जमीन महामंडळाच्या नावे खरेदी करण्यात आली आणि धक्कादायक म्हणजे दीड एकर जमीन ही चक्क रमेश कदमच्या नावावर महामंडळाच्या पैशाने खरेदी करण्यात आली.