अडीच कोटींच्या दागिन्यांची चोरी
By Admin | Published: December 17, 2015 12:54 AM2015-12-17T00:54:45+5:302015-12-17T00:54:45+5:30
घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरात असलेल्या ‘लीलाज ज्वेलर्स’मधून मौल्यवान हिऱ्यांसह अडीच कोटींच्या सोनेचांदीच्या दागिन्यांचा ऐवज लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटे
ठाणे : घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरात असलेल्या ‘लीलाज ज्वेलर्स’मधून मौल्यवान हिऱ्यांसह अडीच कोटींच्या सोनेचांदीच्या दागिन्यांचा ऐवज लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या दुकानाच्या सुरक्षेची भिस्त असलेला सीसीटीव्हीही चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस तपास करीत आहेत.
घोडबंदर रोडवरील वेगा शॉपिंग सेंटरमधील शॉप क्रमांक ४ मध्ये नवीनकुमार जैन यांचे हे दुकान आहे. मंगळवारी रात्री ९.३०च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. त्यानंतर, बुधवारी सकाळी १०वाजता जैन यांचे मावसभाऊ राजकुमार लोढा हे दुकान उघडण्यासाठी आले. त्या वेळी दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दुकानाच्या मागच्या बाजूची खिडकी गॅसकटरने तोडून चोरटे आत घुसले. दुकानातील लॉकर फोडून सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने असे मिळून एकूण अडीच कोटींचा ऐवज चोरीला केल्याचा दावा
नवीन कुमार जैन यांनी रात्री
उशीरा केला.
दुकानाचे मालक नवीनकुमार हे बाहेरगावी गेले असून, ते आल्यानंतर नेमका आणखी किती ऐवज गेला, याची माहिती मिळेल, असे लोढा यांनी पोलिसांना सांगितले. प्राथमिक तपासात बुधवारी पहाटे २ ते ४च्या दरम्यान तीन ते चार जणांच्या टोळक्याने ही लूटमार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी. टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकालाही पाचारण केले
होते. या दुकानाची माहिती असलेल्यांचाच चोरीमध्ये सहभाग असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. कासारवडवली पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारीही या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)