२५% खाद्यतेल भेसळयुक्त; एफडीएने टाकलेल्या धाडींतील धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:45 PM2022-11-24T12:45:27+5:302022-11-24T12:46:37+5:30
भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांना खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या दुकानांचीही चौकशी करण्यात येणार आहे.
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेलाशी संबंधित घातलेल्या धाडींमध्ये सुमारे २५ टक्के नमुन्यात भेसळ आणि त्रुटी आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केंकरे (अन्न) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६५ ते १७५ रुपये लिटर या दराने विकल्या जाणाऱ्या मोहरी तेलात १२० रुपये प्रतिलिटर दर असलेल्या राईस ब्रान तेलाची भेसळ केली जात आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ७०० ते ८०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाऱ्या तुपात ९० ते ९५ रुपये प्रतिलिटर दर असलेल्या पामोलीन तेलाची भेसळ आढळून आली आहे. तसेच १ लिटर पामोलीन तेलाच्या पाऊचमध्ये १५ ते २० ग्रॅम कमी तेल भरून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या दुकानांवर झाली कारवाई
- मे. अनुकूल ॲग्रो, दहिसर
- मे.जय बजरंग ऑइल डेपो, घाटकोपर
- मे. विमल इंटरप्रायजेस, गोवंडी
- मे. ऋषभ शुद्ध घी भांडार, चिंचबंदर
एफडीएचे आवाहन
भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांना खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या दुकानांचीही चौकशी करण्यात येणार आहे. विक्रेत्यांकडून खाद्यतेलाची खरेदी करणारे जे दुकानदार आहेत, त्यांना यासाठी जागरूक करण्यात येणार असून त्यांनाही भेसळीचा संशय येत असेल तर त्यांनी तेलाची विक्री न करता अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री नंबर १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी केले आहे.