छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 08:55 AM2024-05-13T08:55:24+5:302024-05-13T08:56:04+5:30
सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी थोड्याच वेळात येणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ ईव्हीएम बंद पडल्याचे समजते आहे.
राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये आज लोकसभेचे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच लोकांनी रांगा लावल्या असून अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडण्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम होणार आहे. सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी थोड्याच वेळात येणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ ईव्हीएम बंद पडल्याचे समजते आहे.
महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी सोमवारी मतदान होत आहे. यावेळी राज्यातील २९८ उमेदवारांचे भाग्य सीलबंद होणार आहे. पावसाचा अंदाज घेत मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर २५ ईव्हीएम बिघडली होती. तर परळीमध्ये ईव्हीएम मशीनच सुरु होत नव्हते. या सर्व ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आली व त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. तोवर मतदार राजा रांगेतच खोळंबला होता. यामुळे मतदानाच्या पहिल्या टक्केवारीमध्ये घट होण्याची शक्यता आहे.
चौथा टप्पा संपताच देशातील लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३८० म्हणजेच ७० टक्के मतदारसंघातील रणधुमाळी संपणार आहे. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये केवळ १६३ मतदारसंघ शिल्लक राहतील.
मतदारसंघ उमेदवार
नंदुरबार ११
जळगाव १४
रावेर २४
जालना २६
औरंगाबाद ३७
मावळ ३३
पुणे ३५
शिरुर ३२
अहमदनगर २५
शिर्डी २०
बीड ४१