सोलर प्लॅन्टमधून २५ किलोवॅट वीजनिर्मिती
By admin | Published: May 29, 2017 06:28 AM2017-05-29T06:28:30+5:302017-05-29T06:28:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील युवा पिढीकडून मोठ्या अपेक्षा असून त्याबाबत ते आशावादी असल्याचे सातत्याने सांगत आहेत
जयंत धुळप/लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील युवा पिढीकडून मोठ्या अपेक्षा असून त्याबाबत ते आशावादी असल्याचे सातत्याने सांगत आहेत. युथ पॉवरमधून उद्याचा ‘पॉवर इंडिया’ साकारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आणि त्यांच्या या स्वप्नपूर्तीची नांदी, ऐतिहासिक महाड नगरीत स्वत:चा तब्बल २५ किलोवॅट वीजनिर्मिती क्षमतेचा सोलर पॉवर प्लॅन्ट उभारून, त्यावर स्वत:चे दोन प्लॅन्ट यशस्वीरीत्या चालवून कोकणातील पहिला ‘पॉवर युथ’ उद्योजक असा नावलौकिक स्वकर्तृत्वाने महाडचा तरुण उद्योजक जितेश तलाठी यांनी मिळवला आहे.
जितेश तलाठी यांनी आॅटोमोबाइल इंजिनीअरिंगमधील पदवी संपादन केली आहे. नोकरीकरिता मुंबई-पुण्यात जायचे नाही अशी पक्की खुणगाठ बांधून महाडमध्येच काहीतरी करून दाखवायचे असे त्यांनी ठरवले. शीतपेये निर्मितीचा कारखाना आणि बर्फाचा कारखाना या दोन घरातील पारंपरिक व्यवसायांचा विचार करून, त्यामध्येच आपण उतरायचा निर्णय त्यांनी घेतला. कुटुंबाच्या पारंपरिक कारखान्याचे रूपांतर मॉडर्न प्लॅन्टमध्ये करण्याचे निश्चित करून, सर्वप्रथम मानव संचालित शीतपेये निर्मितीचा कारखाना पूर्णपणे स्वयंचलित (आॅटोमॅटिक) करून त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यात यश मिळविले. सद्यस्थितीत त्यांच्या या शीतपेयाच्या आॅटोमॅटिक बॉटलिंग प्लॅन्टमध्ये दर तासाला एक हजार बाटल्यांचे बॉटलिंग होते. बॉटलिंग प्लॅन्ट पूर्णपणे आॅटोमॅटिक असल्याने शीतपेयांंची शुद्धता उच्चप्रतीची राखण्यातही त्यांनी यश मिळविले आहे. अशाच प्रकारे आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा सातत्याने कौशल्यपूर्वक वापर करून त्यांनी आपल्या बर्फाच्या कारखान्यातही अनेक प्रयोगकरून तो अत्याधुनिक केला आहे.
दोन्ही कारखाने चालविण्याकरिता विनाखंड विजेची नितांत गरज असते. अनेकदा वीज खंडित होण्याच्या समस्येस त्यांना सामोरे जावे लागत होते. पेट्रोल वा डिझेलवर चालणाऱ्या जनरेटर्समधून उपलब्ध होणारी वीज आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने, त्यांनी अखेर सौर उर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता ‘पंतप्रधान रोजगार योजने’चा त्यांनी अभ्यास करून, रायगड जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधला. ‘पंतप्रधान रोजगार योजने’मधून उपलब्ध वित्तीय साहाय्यातून आपल्या प्लॅन्टच्या इमारतीच्या टेरेसवरच सोलर पॅनल्स बसवून, २५ किलोवॅट वीजनिर्मिती क्षमतेचा सोलर पॉवर प्लॅन्ट तयार केला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने देखील जितेश यांच्या या सोलर पॉवर प्लॅन्टला मान्यता देवून, त्या प्लॅन्टमधून तयार होणाऱ्या विजेपैकी अतिरिक्त वीज प्रति युनिट चार रुपये दराने विकत घेण्याकरिता करार देखील केला. जितेश आपली विजेची गरज भागवून अनेकदा अतिरिक्त वीज वीज वितरण कंपनीच्या ‘पॉवर ग्रीड’ला देत आहेत.
२५ किलोवॅट विजेची बचत
१स्वत:च्या सोलर पॉवर प्लॅन्टमधून २५ किलोवॅट वीजनिर्मिती करून, स्वत:च्या प्लॅन्टकरिता ती जितेश वापरत असल्याने, त्यांना दररोज २५ किलोवॅट वीज आता वीज वितरण कंपनीकडून घ्यावी लागत नाही. परिणामी त्यांनी सरकारी वीज वितरण कंपनीवरील वीज पुरवठ्याचा भार कमी करुन, राज्यात दररोज २५ किलोवॅट विजेची बचत करुन दाखविली आहे, हा अन्य उद्योजकांकरीता एक चांगला वस्तुपाठ ठरला आहे.
२येत्या काही महिन्यात ४५ किलोवॅट वीजनिर्मिती क्षमतेचा सोलर पॉवर प्लॅन्ट आपण कार्यान्वित करीत असून, त्या विजेवर माझा १० टन बर्फ निर्मितीचा प्लँट चालणार आहे. हा दुसरा सोलर पॉवर प्लॅन्ट कार्यान्वित झाल्यावर एकूण वीजनिर्मिती ७० किलोवॅट होईल. परिणामी राज्याच्या वीज वापरात मी ७० किलोवॅट विजेची बचत करू शकेन असा विश्वास जितेश तलाठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.