२५ लाख लिटर पाणी घेऊन जलपरी लातुरात

By admin | Published: April 21, 2016 03:18 AM2016-04-21T03:18:18+5:302016-04-21T03:18:18+5:30

लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले.

With 25 lakh liters of water, | २५ लाख लिटर पाणी घेऊन जलपरी लातुरात

२५ लाख लिटर पाणी घेऊन जलपरी लातुरात

Next

५० वॅगनची पहिली खेप : १० वॅगनच्या झाल्या ९ खेपा
लातूर : लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले. मंगळवारी रात्री १०.५५ वाजता मिरजहून निघालेली ही जलपरी बुधवारी सकाळी ७.५५ वाजता २५ लाख लिटर पाणी घेऊन पोहोचली.
पाणीटंचाई असलेल्या भागांत रेल्वेद्वारे एकाचवेळी २५ लाख लिटर पाण्याची वाहतूक केली जाण्याची ही देशात पहिलीच वेळ असावी. जलपरीच आगमन झाल्यानंतर ८.३० वाजेपासून ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. लातूर रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीत हे पाणी साठविले जात आहे. त्यानंतर ते टँकरच्या सहाय्याने आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात व तेथून टँकरने शहरात वितरीत केले जाणार आहे.
या पाण्यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला असून, डोंगरगाव, साई येथून बुधवारी उपलब्ध होणाऱ्या पाण्यापेक्षा रेल्वेचे हे पाणी जास्त आहे. बुधवारी सकाळी आलेल्या जलपरीतील पाणी ४.४५ वाजेपर्यंत उतरवून घेण्यात आले. या जलपरीचे स्वागत महापौर अख्तर शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केले. रेल्वेचे मुख्य मोटारमन सुनील खोत आणि सहाय्यक मोटारमन बी.जे. पोळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे
वॅगन रिकामे करण्यास विलंब
रेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीत ५० वॅगनमधील पाणी उतरविण्यात येत असताना विहिरीपासून टँकर पॉर्इंटपर्यंत बसविण्यात आलेला पाईप निसटला. त्यामुळे रेल्वे वॅगन रिकामी करण्यास विलंब झाला. जवळपास आठ तासांचा कालावधी वॅगन रिकामे होण्यास लागला.
पुरवठा करणाऱ्या विहिरीवर सीसीटीव्ही
लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या रेल्वे टँकरवर रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्याचा साठा व उपसा करण्यात येणाऱ्या हैदरखान विहिरीच्या काठावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
सायंकाळी जलपरी मिरजेकडे रवाना
बुधवारी सकाळी आलेली जलपरी रिकामी होण्यास तब्बल आठ तासांचा कालावधी लागला. पाणी उतरवून घेतल्यानंतर जलपरी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मिरजेकडे रवाना झाली असल्याचे लातूर रेल्वे स्थानकातील व्यवसाय विभागातील मुख्य इन्स्पेक्टर आर.टी. काळे यांनी सांगितले.
>रेल्वेमंत्री मिरजेत येणार ? लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या प्रयोगाची संपूर्ण देशात चर्चा आहे. पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने मिरजेतील रेल्वे विभागाला रोख पारितोषिक जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुढील आठवड्यात मिरज व लातूर येथे भेट देऊन रेल्वेच्या या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करणार आहेत.

Web Title: With 25 lakh liters of water,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.