कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत देण्याची घोषणा
By admin | Published: August 31, 2016 05:26 PM2016-08-31T17:26:50+5:302016-08-31T17:26:50+5:30
विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसंच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे.
Next
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदे यांचं बुधवारी निधन झालं. गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदेंना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली.
दरम्यान, विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसंच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे.
वाहतूक पोलिसांकडून सध्या मुंबईतील सगळया वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली . २३ ऑगस्ट रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांनी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराकडे त्याच्या गाडीची माहिती मागितली.
पण शिंदे यांना माहिती देण्यास दुचाकीस्वाराने नकार दिला. दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यांनी दुचाकीस्वाराला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जायची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या दुचाकीस्वाराने शिंदे यांना मारहाण सुरु केली. तिथे असलेले एक लाकूड उचलून त्याने शिंदे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. शिंदे रक्ताच्या थारोळयात तिथे कोसळले. ते पाहून भेदरलेला दुचाकीस्वार तिथून पसार झाला.
गंभीर अवस्थेत त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्धअवस्थेत होते. अखेर आज बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी मालवणी येथून अटक केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विलास शंदे यांना झालेल्या माराहणीचा उल्लेख केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यांनी रुग्णालयात जाऊन विलास शिंदे यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली होती.