जगभरातल्या 12 देशांमधून 25 महाराष्ट्र मंडळांचा ‘लोकमत’च्या व्यासपीठावर स्नेहबंध!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 05:44 PM2018-04-12T17:44:45+5:302018-04-12T17:44:45+5:30
‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ असं ध्येय असलेल्या लोकमत वृत्तसमूहाने जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांना यंदाच्या या दिमाखदार सोहळ्यासाठी सन्मानानं निमंत्रित केलं होतं. यावर्षीचे विजेते निवडण्यासाठी झालेल्या आॅनलाईन मतदानात महाराष्ट्राबाहेरच्या या सुह्रुदांनीही आपला सहभाग नोंदवला होता.
- लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर सोहळ्याची ‘ग्लोबल’ झेप
माणसं देशांतर करतात ती स्वप्नांच्या शोधात!
पण, देशांची सीमा ओलांडली, भाषा बदलली, नवे रीतिरिवाज अंगवळणी पडले, दत्तक देशाच्या संस्कृतीशी जुळवून घेता येऊ लागलं आणि नव्या भूमीत मुळं रुजली, की मराठी माणसाला दिवाळीच्या पणत्या दिसू लागतात... मराठी नाटकं साद घालतात... मराठी कविता-गाणी ओठांवर येतात.
अगदी उत्तर अमेरिकेपासून आता शेजारी चीनपर्यंत सर्वत्र पसरलेल्या महाराष्ट्र मंडळांचं मूळ या मायदेशाच्या धाग्याशी जोडलेलं आहे.
- या धाग्याची एक नवी गाठ बांधण्याची सुरुवात झाली लोकमत वृत्तसमूहाच्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर 2018’ या सोहळ्यात!
‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ असं ध्येय असलेल्या लोकमत वृत्तसमूहाने जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांना यंदाच्या या दिमाखदार सोहळ्यासाठी सन्मानानं निमंत्रित केलं होतं. यावर्षीचे विजेते निवडण्यासाठी झालेल्या आॅनलाईन मतदानात महाराष्ट्राबाहेरच्या या सुह्रुदांनीही आपला सहभाग नोंदवला होता.
उत्तर अमेरिकेतून एकूण पंधरा संस्था यावर्षीच्या सोहळ्याच्या ‘सहयोगी’ होत्या. त्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या मराठी मंडळांची मातृसंस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचा समावेश होता. शिवाय महाराष्ट्र मंडळ बे एरिया, सॅन डिआगो महाराष्ट्र मंडळ, मराठी मंडळ- लॉस एंजेलिस, सिआटल महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र मंडळ- नॉर्थ कॅरोलिना, मराठी मंडळ- सक्रमेंटो, शार्लट मराठी मंडळ, डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ्, अल्बनी महाराष्ट्र मंडळ, ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ, बफेलो मराठी मित्र परिवार आणि जय भारत ढोल ताशा पथक यांचा समावेश होता.
कॅनडातील मराठी भाषिक मंडळ टोरोंटो हेही या सोहळ्याचे सहयोगी होते.
युरोपीय देशांमधील मराठी संस्थाही यानिमित्ताने ‘लोकमत’च्या व्यासपीठावर आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र मंडळ - म्युनिक(जर्मनी), महाराष्ट्र मंडळ - पॅरीस (फ्रान्स), इल्फर्ड मित्र मंडळ - लंडन, स्लाव्ह मित्र मंडळ- युके, महाराष्ट्र मंडळ - नेदरलॅण्डस, बेल्जियम मराठी मंडळ- ब्रसेल्स यांचा समावेश होता.
याशिवाय मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, तोक्यो मराठी मंडळ (जपान), महाराष्ट्र मंडळ - व्हिक्टोरिया (आॅस्ट्रेलिया), महाराष्ट्र मंडळ ,कुआलालम्पूर (मलेशिया) आणि चीनमधले शांघाई मराठी मंडळ यांनीही यंदाच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ सोहोळ्यासाठी आपला सहयोग दिला.
लंडनचे महाराष्ट्र मंडळ ’ग्लोबल महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’
भारताबाहेर स्थापन झालेलं पहीलं मराठी मंडळ अशी ख्याती असलेल्या लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचा ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 1956 पासून मंडळाचे सक्रीय सभासद असलेले लंडननिवासी मुकुंद नवाथे यांनी हा सन्मान स्वीकारला.
गेल्यावर्षीच्या सोहळ्यात उत्तर अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळांची मातृसंस्था असलेलं बृहन्महाराष्ट्र मंडळ ‘लोकमत’च्या या विशेष सन्मानाचं मानकरी ठरलं होतं.
लंडनच्या महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली १९३२ मध्ये. म्हणजे तब्बल ८६ वर्षं झाली या गोष्टीला. लंडन नावाच्या महानगरात नोकरी-व्यापारासाठी गेलेल्या मराठी माणसांची वस्ती हळूहळू जमू लागली होती. सेंट्रल लंडनमधल्या गॉवर स्ट्रीटवर ‘इंडियन स्टुडंट्स होस्टेल’ होतं. तिथे मंडळी संध्याकाळच्या चहाला, गप्पाटप्पांना जमत. १९३२ च्या गोलमेज परिषदेसाठी भारतातून महत्त्वाची मंडळी लंडनला येणार होती. त्यातल्या मराठी मान्यवरांना चहासाठी बोलवायचं ठरलं.
आणि एका संध्याकाळी एक खाशी मैफल जमली. प्रमुख अतिथी होतेच मोठे तोलामोलाचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जयकर आणि साहित्यसम्राट न. चिं. केळकर. सगळ्यांची भाषणं झाली. गप्पा रंगल्या आणि न. चिं. केळकरांनी जाहीर केलं, ‘आज या लंडनमध्ये महाराष्टÑ मंडळाची स्थापना झाली असे मी जाहीर करतो.’
- लंडनचं महाराष्ट्र मंडळ जन्माला आलं ते असं थोरामोठ्यांच्या सहवासात. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूूर्वी तब्बल पंधरा वर्षं थेट सायबाच्या देशात मराठी झेंडा रोवणारं ‘लंडन महाराष्ट्र मंडळ’ हे जगाच्या पाठीवरलं भारताबाहेरचं सर्वात पहिलं मराठी मंडळ.
.. आज या मंडळाची लंडनमध्ये स्वत:ची वास्तू आहे. वर्षभर सातत्याने चालू असणारे विविध कार्यक्रम लंडनमधल्या मराठी माणसांसाठी मोठा दिलासा असतो. गेली ८६ वर्षं भारताबाहेर मराठीचा ध्वज उंच उभा ठेवणाऱ्या या ज्येष्ठ मातृसंस्थेचा गौरव ही लोकमत समूहाची अभिमानाची गोष्ट आहे.