स्वाइनचे २५ नवे रुग्ण
By admin | Published: August 27, 2015 02:54 AM2015-08-27T02:54:40+5:302015-08-27T02:54:40+5:30
गेल्या आठवड्यापासून रोजच्या रोज वीसहून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवार, २६ आॅगस्ट रोजी स्वाइन फ्लूचे २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
- आठ महिन्यांत अडीच हजार रुग्ण
मुंबई : गेल्या आठवड्यापासून रोजच्या रोज वीसहून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवार, २६ आॅगस्ट रोजी स्वाइन फ्लूचे २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आॅगस्ट महिन्यांत १३ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या तीन दिवसांत स्वाइनचे ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो फैलावण्याचे प्रमाण जास्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २०१५ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात स्वाइनची साथ राज्यात पसरली होती. जुलैमध्ये पुन्हा मुंबईत स्वाइनचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत मुंबईत २ हजार ५९८ स्वाइनचे रुग्ण आढळून आले आहेत.
स्वाइन फ्लूची लक्षणे ही फ्लूसदृश असल्याने अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. स्वाइन फ्लूची लक्षणे ही पाच ते सहा दिवसांनंतर दिसून येतात. ही लक्षणे फ्लूसदृश असल्याने अनेक रुग्ण तीन ते चार दिवस लक्ष देत नाहीत. यामुळेच गुंतागुंत वाढते. आठ महिन्यांच्या कालावधीत ४३ मुंबईकरांना स्वाइन फ्लूमुळे जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत २३२ गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची लस देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)