२५ टक्के आॅनलाइन शाळा प्रवेशास मुदतवाढ
By Admin | Published: July 19, 2016 03:08 AM2016-07-19T03:08:06+5:302016-07-19T03:08:06+5:30
मुलांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी राखीव २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात जिल्हा परिषदेने राबवली.
ठाणे : वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी राखीव २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात जिल्हा परिषदेने राबवली. त्यानुसार, एक हजार ३५१ विद्यार्थ्यांची निवड झाली, पण अवघ्या ६७ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून दिसते. उर्वरित एक हजार २२३ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन करून शिक्षण विभागाने पुन्हा मुदतवाढ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई या सहा महापालिकांतील खाजगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल गटांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, अशा तक्र ारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे वारंवार आल्यावर जिल्ह्यातील महापालिका हद्दीतील शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, प्रवेश प्रक्रि येत वंचित व दुर्बल गटांसाठी २५ टक्के आरक्षण देऊन त्यासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रि येद्वारे प्रवेश दिला. यासाठी जिल्हा परिषदेने दोन टप्प्यांत विशेष कार्यक्रम राबवला.
या टप्प्यात जिल्ह्यातील ५६० शाळांसाठी एक हजार ३५१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रि येसाठी निवड झाली. त्यापैकी केवळ ६७ विद्यार्थ्यांनीच त्यांना दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतला असून तब्बल एक हजार २२३ विद्यार्थ्यांनी अद्यापही त्यांना दिलेल्या शाळेत प्रवेश घेतला नाही. पालकांना याबाबत अडचणी असल्यास त्यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी व मनपा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
>यापुढे मुदतवाढ नाही
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ती १९ जुलै असून जर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसेल तर त्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा. तसेच यापुढे मुदतवाढ देणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.