यंदा २५ टक्के जादा पाऊस!

By admin | Published: May 25, 2016 04:00 AM2016-05-25T04:00:09+5:302016-05-25T04:00:09+5:30

राज्यात यंदा सरासरीच्या २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असून, अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला

25 percent more rain this year! | यंदा २५ टक्के जादा पाऊस!

यंदा २५ टक्के जादा पाऊस!

Next

- यदु जोशी,  मुंबई

राज्यात यंदा सरासरीच्या २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असून, अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे हवामान खात्याने राज्य शासनाला कळविले आहे. हे लक्षात घेता आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या धर्तीवर संबंधित सर्व घटकांशी समन्वय राखून काम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार वायुदल, नौसेना आणि लष्कराच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन सेलतर्फे मुंबईत पाणी साठून धोका उद्भवू शकतो अशी २५ ठिकाणे शोधून त्या ठिकाणांची पाहणी येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहे.
मुख्य सचिव क्षत्रिय यांनी ‘लोकमत’ला सांगितले, भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी आमच्या बैठकीत पावसाच्या अंदाजाची माहिती दिली. त्यानुसार गेल्या ५० वर्षांतील पावसाच्या सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस पडू शकतो. दुष्काळाने होरपळत असलेल्या राज्यात प्रशासन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करीत असतानाच संभाव्य अतिवृष्टी व त्यातून येणारा ओला दुष्काळ यावर मात करता यावी म्हणून यंत्रणा सज्ज ठेवावी लागत आहे.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणार
महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांच्या धरणाचे पाणी (बॅक वॉटरसह) अतिवृष्टीच्या परिस्थितीत महाराष्ट्रात येऊन बरेचदा हाहाकार उडतो. या संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी या राज्यांच्या यंत्रणांशी आधीच संपर्क करून उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे क्षत्रिय यांनी सांगितले. आरोग्य, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, जलसंपदा आदी विभागांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.


देशात १०९ टक्के पाऊस
पुणे : महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडणार असून, तो सरासरीपेक्षा जास्त असेल. एकूणच देशातही चांगला पाऊस पडणार असून, तो सरासरीच्या १०९ टक्के पडेल, असा सुधारित अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने मंगळवारी जाहीर केला.
जूनमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी असेल. तो सरासरीच्या ८७ टक्केच पडेल. उर्वरित ३ महिन्यांत मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

Web Title: 25 percent more rain this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.