उद्योगांसाठी २५ टक्के पाणी कपात अद्याप कायम
By admin | Published: July 15, 2016 06:17 PM2016-07-15T18:17:07+5:302016-07-15T18:17:07+5:30
तापी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना अद्याप हायकोर्टाच्या आदेशानुसार २५ टक्के पाणी कपात सुरू आहे.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 15 - तापी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना अद्याप हायकोर्टाच्या आदेशानुसार २५ टक्के पाणी कपात सुरू आहे. या संदर्भात पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थिती ‘जैसे थे’च राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मे महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना पाणी कपातीसंदर्भात कोर्टाकडे दाद मागण्यात आली होती. तेव्हा कोर्टाने उद्योगांना दोन टप्प्यांत अनुक्रमे २० व २५ टक्के कपात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार येथील एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना २७ एप्रिलपासून २० टक्के तर १० मे पासून २५ टक्के पाणी कपातीचा निर्णय अंमलात आणण्यात आला होता. मद्यनिर्मिती उद्योगांना यापेक्षा अधिक प्रमाणात कपातीचे निर्देश असल्याचे सूत्र म्हणाले.
येथील औद्योगिक क्षेत्रात लहान-मोठे सुमारे ५५० उद्योग आहेत. या सर्वांना १० मे पासून २५ टक्के कपात करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात उद्योगांकडून कोणतीही खळखळ व्यक्त न करता या आदेशाची अंमलबजावणी करण्याची हमी देण्यात आली होती. तसेच या पाणी कपातीमुळे कोणत्याही उद्योगाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
उद्योगांना सध्या सुरू असलेल्या २५ टक्के पाणी कपातीसंदर्भात मुख्य कार्यालयाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. एमआयडीसीच्या स्वमालकीच्या तलावात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे २८ दलघफू (एफसीएमटी) पाणी साठा झालेला आहे. तलावाची क्षमता ६५ दलघफू एवढी आहे. त्यामुळे तलावात हल्ली ४५ टक्के साठा उपलब्ध आहे. परंतु अद्याप कोणतेही आदेश न मिळाल्याने उद्योगांना २५ टक्के कपातीनुसार पाणीपुरवठा केला जात आहे.