क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये २५% आरक्षण हवे!
By admin | Published: July 2, 2017 04:47 AM2017-07-02T04:47:56+5:302017-07-02T04:47:56+5:30
क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली.
एका कार्यक्रमासाठी नागपुरात
आले असता रविभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाककडून भारताचा दारुण पराभव झाला. या संपूर्ण स्पर्धेत भारत एक तगडा दावेदार होता. तसेच पहिल्या सामन्यात भारताने पाकचा एकतर्फी पराभव केला होता. असे असताना अंतिम सामन्यात भारताचा इतक्या लाजिरवाण्या पद्धतीने पराभव होणे, हे संशयास्पद आहे. तो सामना ‘फिक्स’ तर नव्हता ना? अशी शंका येते. त्यामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करताना विविध मागासवर्गीय महामंडळातील कर्जही माफ करण्यात यावे, याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.
स्वतंत्र विदर्भासाठी २५ आॅगस्टपासून आंदोलन
केंद्रात आणि राज्यात भाजपाच सत्तेवर आहे. तेव्हा भाजपाने आतातरी स्वतंत्र विदर्भ राज्याचा निर्णय घ्यावा. यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत.
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर रिपाइंची भूमिका स्पष्ट असून, येत्या २५ आॅगस्टपासून आंदोलन सुरू केले जाईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
गोरक्षकांचा जो हैदोस सुरू आहे, त्याचा निषेध करीत गोवंश हत्या या शब्दातून ‘वंश’ हा शब्द काढण्यात यावा, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गोहत्येला प्रतिबंध करणाऱ्या जुन्याच कायद्याची अंमलबजावणी व्हावी, असेही ते म्हणाले.