२५ वर्षांनंतर एसटीची पुन्हा ‘स्लीपर’ सेवा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 05:53 AM2019-01-13T05:53:35+5:302019-01-13T05:54:07+5:30
२०० नव्या स्लीपर-सीटर गाड्यांचे नियोजन : एसटीच्या ताफ्यात वाढणार १ हजार ३०० गाड्या
- चेतन ननावरे
मुंबई : एसटीच्या रातराणी बसमध्ये आता आरामात झोपून प्रवास करता येणार आहे. एसटी प्रशासनाने २०० स्लीपर-सीटर बसच्या चेसी खरेदी केल्या आहेत. या गाड्या नॉन एसी असल्याने त्यांचे तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे असेल. याशिवाय प्रशासनाने ४०० वातानुकूलित शिवशाही आणि ७०० साध्या एसटी बसेसच्या चेसीही घेतल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात आता १ हजार ३०० नव्या बसेस दाखल होतील.
तूर्तास या १ हजार ३०० नव्या बसच्या चेसी खरेदी करण्यात आल्या असून, बांधणीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. प्रामुख्याने १२ मीटर लांबीच्या २०० स्लीपर-सीटर बसच्या चेसीसह ११ मीटर लांबीच्या ७०० साध्या बस आणि १२ मीटर लांबीच्या ४०० वातानुकूलित बसच्या चेसी खरेदी करण्यात आल्या आहेत. यामधील ७०० बससाठी राज्य शासनाने मदत केली असून, ६०० बस महामंडळाने स्वत: खरेदी केलेल्या आहेत. खासगी स्पर्धेला तोंड देण्यास स्लीपर-सीटर बसचा वापर करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.
या आधी एसटीने २५ वर्षांपूर्वी मुंबई सेंट्रल ते गोव्यातील बेती या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर स्लीपर-सीटर बस सुरू केली होती. मात्र, त्या बसची उंची अधिक असल्याने घाटात बस कलंडण्याची भीती व्यक्त होऊ लागली. परिणामी, अवघ्या दोन आठवड्यांत ही सेवा बंद करण्यात आली. मात्र, या नव्या रातराणीमुळे प्रशासनाला पुन्हा स्लीपर-सीटर बस रस्त्यावर आणण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.