जखम २५ वर्षांपूर्वीची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 03:09 AM2018-03-11T03:09:10+5:302018-03-11T03:09:10+5:30

‘दहशतवाद’ हा विषय आज जागतिक पातळीवर चिंतेची बाब आहे. कुठे सिरिया, कुठे अफगाणिस्तान, आपल्या देशात तर काश्मीर सतत जळतोय. हे सारे पाहिले की मन अस्वस्थ होते. कारण हे नुसते पाहणे नाहीये, तर या जिवंत अनुभवातून मी स्वत: होरपळून निघालोय.

 25 years ago! | जखम २५ वर्षांपूर्वीची!

जखम २५ वर्षांपूर्वीची!

googlenewsNext

- तुषार प्रीती देशमुख

‘दहशतवाद’ हा विषय आज जागतिक पातळीवर चिंतेची बाब आहे. कुठे सिरिया, कुठे अफगाणिस्तान, आपल्या देशात तर काश्मीर सतत जळतोय. हे सारे पाहिले की मन अस्वस्थ होते. कारण हे नुसते पाहणे नाहीये, तर या जिवंत अनुभवातून मी स्वत: होरपळून निघालोय. आयुष्याचा अतिसंवेदनशील कप्पा म्हणजे 'आई'. तिच्या आठवणीने सतत विव्हवळत होतो. जगात कुठेही ‘बॉम्बस्फोट’ झाला हे कळले की माझ्या डोळ्यांसमोर सन १९९३चा तो भीषण बॉम्बस्फोट येतो. माझ्यासमोर हल्ल्यात जखमी झालेला, रक्ताने माखलेला, अंगावर स्फोटामध्ये उडालेल्या ठिकºयांचे अवशेष ल्यायलेला, जिवाच्या आकांताने धावणारा मनुष्य क्षणार्धात सदृश होतो.


असे म्हणतात की ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’. ही म्हण सगळ्यांनी अनेकदा ऐकली असेल. माझे सारेच उद्ध्वस्त झाले. अवघा १३ वर्षांचा असताना या दहशतवादी हल्ल्यात माझ्या माउलीला मी गमावले. गरीब, कष्टकरी माणसांसाठी दोन वेळचे जेवण आणि आपल्या परिवारासाठी सर्वस्व असणाºया कुटुंबात तिचा पदर धरून मोठा होत होतो. आणि अशा वेळी तिचा अचानक बळी जाणे? निष्पाप माणसाला इतके दुर्दैवी मरण? तेही काही विकृत लोकांच्या स्वार्थासाठी. आज जगभरात तेच होते आहे. मूठभर लोक देशच्या देश वेठीस धरत आपले क्रूर ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने अगदी इतर ग्रहांवरही पाय ठेवला तरीही मानवी मनाच्या नीच पातळीपर्यंत तो तितक्याच वेगाने पोहोचून विध्वंस करू शकतो हे कटू सत्य आहे.
बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या पीडित कुटुंबाला शासन आर्थिक पाठबळ देते. मात्र मेलेल्या माणसाची पैशांपेक्षाही जास्त किंमत असते ती हरवलेल्या नात्यांची. मी १३ वर्षांचा होतो, मात्र नंतर घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटात तान्ह्या एक-दीड वर्षाच्या लेकरांच्या आई गेल्या. आईचा चेहरा नुकताच पाठ व्हायला लागला असताना, तिच्या स्पर्शाने ती आपली माउली आहे हे ओळखत असतानाच्या काळात हा आघात नियती.. अहं.. हा दहशतवाद करतो.
माझ्या आईचे शेवटचे दर्शन अजूनही आठवते.. चेहºयाचा एक भाग फक्त ओळखता आला. त्यावरून इतर तुकडे गोळा केले. तिच्या गळ्यातले मंगळसूत्र इतस्तत: विखुरले होते. असे क्षण कुणाच्याही वाट्याला येऊ नये.
या बॉम्बस्फोटाला या वर्षी २५ वर्षे झाली. या २५ वर्षांत जग पुढे सरकले. मलाही सांगितले गेले... विसरून पुढे जा म्हणून. पण शक्य नव्हते आणि सोप्पे तर मुळीच नाही. आईनंतरचे आयुष्य प्रचंड खडतर आणि अनेक आव्हानांनी भरलेले गेले. जेव्हा समाजातील २७५ प्रतिष्ठितांनी याकुब मेमनच्या फाशीला दया अर्ज दिला तेव्हा पुन्हा एकदा देशांतर्गत असलेला हा दहशतवाद सपशेल मिटवावा या विचाराने मी पेटून उठलो. सह्यांची मोहीम घेतली, सामान्य जनतेचे पाठबळ मिळाले आणि थेट राज्यपालांना भेटलो. याकुबला फाशी झाली आणि मला अनेक धमक्यांचे फोन आले. मरण जवळून पाहिलेल्याला आणि आयुष्यात सर्वात मोलाची गोष्ट गमावलेल्या माणसाला असल्या गोष्टींची भीती वाटेनाशी होते.
माणूस जेव्हा समाजाच्या नजरेत ‘हीरो’ असतो तेव्हा त्याची प्रत्येक कृती ही सामाजिक भान आणि जबाबदारीयुक्त असायला हवी. त्याचे अनुकरण अनेक जण करतात. मात्र, पैसा, प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर ज्या जनतेमुळे ही माणसे या पदावर पोहोचली त्याचे भानही न उरता देशाच्या जिवावर उठणाºयांना अशी माणसे मदत करतात तेव्हा तेही देशद्रोहीच आहेत.
या २५ वर्षांत बरंच काही बदललं आहे. पुढेही अनेक बदल घडतील. मात्र, मनात बसलेली दहशत, धुमसणारा प्रतिशोधाचा अग्नी कसा शांत व्हावा? बलिदान मग ते सैनिकाचे असो, पोलिसांचे असो, अग्निशमन दलाचे असो किंवा देशाच्या सामान्य रयतेचे असो ते व्यर्थ नाहीये. ही जाणीव प्रत्येक नागरिकाच्या मनात सदोदित राहिली पाहिजे. शाळा-महाविद्यालयांमध्ये तरुण पिढी घडताना त्यांनी या साºयांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. तेव्हाच जबाबदार, सतर्क नागरिकांची पिढी उभी राहील. राष्ट्रहित आणि राष्ट्रप्रेम आपल्या नसानसात भिनलं पाहिजे. तेव्हाच एकजुटीने, एकदिलाने आपण येणाºया कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो.
जोपर्यंत दहशतवादाचा समूळ खात्मा होत नाही, अशी कृत्ये करणाºया नराधमांना जबर शिक्षा होत नाही, तोपर्यंत जिवाला शांतता लाभणार नाही. सन १९९३च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी दाऊद व त्याचे अनेक सहकारी अजूनही मोकाट आहेत. न्याय कधी मिळणार, अजून किती वर्षं प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न आहे.

या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सामान्य नागरिकांना श्रद्धांजली देण्यासाठी दरवर्षी सेंच्युरी बाजार येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या स्थळी आम्ही भेटतोच. पण ज्यांना येथे येऊन श्रद्धांजली वाहायची आहे तेही येऊ शकतात. येत्या १२ मार्चला सेंच्युरी बाजार बस स्टॉपला लागुन जे स्मारक आहे तेथे सायंकाळी ५ वाजता येऊन श्रद्धांजली म्हणून सही करावी. या दहशदवादाविरुद्ध सह्यांच्या मोहिमेचे पत्र आपण राज्यपाल, मुख्यमंत्री यांना सुपुर्द करणार आहोत. तरी आपण सर्वांनी यावे हे नम्र आवाहन.

Web Title:  25 years ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.