२५ वर्षांनंतर गाव झाले ‘पाणीदार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:46 AM2018-05-13T04:46:09+5:302018-05-13T04:46:09+5:30
सोनगव्हाण ग्रामस्थांची गेल्या तब्बल २५ वर्षांपासून चाललेली पाण्यासाठीची वणवण सरपंचांच्या कृतिशील पुढाकारामुळे थांबली आहे.
नंदकिशोर नारे
वाशिम : सोनगव्हाण ग्रामस्थांची गेल्या तब्बल २५ वर्षांपासून चाललेली पाण्यासाठीची वणवण सरपंचांच्या कृतिशील पुढाकारामुळे थांबली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगसह विविध उपक्रम राबवून सरपंच शरद गोदारा यांनी सोनगव्हाण ‘पाणीदार’ केले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गावात घामाच्या धारांसोबतच, पाटाचे पाणीही वाहात आहे.
भौगोलिकदृष्ट्या सोनगव्हाण पैनगंगेच्या तिरावर वसलेले असले; तरीही हिवाळा संपताच पैनगंगेचा प्रवाह दूषित व्हायचा.
गावकुसातील नैसर्गिक आणि कृत्रिम असे सर्वच जलस्रोत हिवाळ्यातच तळ गाठायचे.
कोरडे पडणारे सोनगव्हाण कल्पक सरपंच शरद गोदारा यांच्या पुढाकाराने अडीच दशकांनंतर जलयुक्त झाले आहे.
गावातील बंद पडलेल्या कूपनलिकांना व हातपंपांना नवसंजीवनी देण्यात आली.
तसेच पावसाचे पाणी वाया
न घालवता शोषखड्ड्यांमार्फत
त्याचा निचरा करून रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्राचा वापर केल्याने भूजलपातळी वाढली व परिणामत: अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कूपनलिकांना तुडुंब पाणी लागले.
आतापर्यंत ५ किमी अंतरावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत
होती. उन्हाळ्यात गावकरी
स्थलांतर करून संपूर्ण गाव ओस पडायचा. मात्र आता ही परिस्थिती पालटली आहे.
या गावाचा आदर्श घेऊन इतरांनाही असे उपक्रम राबवण्याची आवश्यकता असून त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़