२५ वर्षांत प्रश्न का सुटले नाहीत?
By admin | Published: November 9, 2015 11:58 PM2015-11-09T23:58:51+5:302015-11-10T00:01:32+5:30
तुम्ही आता विरोधी पक्षातच : जठार यांचा राणेंना टोला
कणकवली : वर्षभराच्या आमच्या सत्तेत जिल्ह्याचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून बोंब मारून आंदोलने करता. तर गेल्या २५ वर्षांत सत्ता आणि मंत्रिपदे असताना प्रश्न सुटले का नाहीत याचा जाब आधी तुमच्या पिताश्रींना विचारा. जनतेने तुम्हाला ओळखले असून यापुढे तुम्हाला विरोधातच काम करावे लागणार, असे प्रत्युत्तर माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार नीतेश राणे यांना प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिले आहे.
गेल्या २० वर्षांत अपघातात १० हजार मृत्यू महामार्गावर झाले. चिपी विमानतळाचे दहा वर्षांत तीन वेळा भूमिपूजन झाले. सी-वर्ल्डची दहा वर्षे घोषणाच होत आहे. आनंदवाडी प्रकल्प रखडला. तेव्हा तुम्ही व तुमचे पिताश्री कुठे होते, असा प्रश्न जठार यांनी उपस्थित केला आहे.
सी-वर्ल्डचा प्रकल्प रद्द झाला असे आम्ही कधीच म्हटले नाही, तर तोंडवळीत जागा न मिळाल्यास तो जिल्ह्याबाहेर जाऊ न देता पर्यायी जागा देऊ, असे म्हटले आहे. सागरी महामार्गाचा ताबा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे गेला आहे.
त्या मार्गासाठी आता जास्त निधी मिळेल. प्रशासनातील काहीच माहिती नसलेल्या तुम्हासारख्यांना फक्त पालकमंत्र्यांवर टीका करण्याचे कळते. ऊठसूट आंदोलने करून कामे होत नाहीत.
विधिमंडळात संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न सोडवायचे असतात. मुंबईतील प्रकल्प इतर राज्यांत जाण्यापेक्षा सिंधुदुर्गात आले तर तुमच्या पोटात का दुखते हे कळत नाही.
आम्ही विकासाची मोठी स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतो. आम्ही
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. मी सहा-सात वर्षांपूर्वी राजकारणात आलो,
पण नारायण राणे ४० वर्षे राजकारणात आहेत आणि सिंधुदुर्गाच्या राजकीय क्षेत्रात २५ वर्षे केंद्रबिंदू आहेत.
त्यांनी ठरवले असते तर खूप काही शक्य होते. मात्र, त्यांनी जिल्ह्याचा सत्यानाश केला. रोजगार निर्माण केला नाहीच, प्रकल्पही अर्धवट ठेवले. पाण्याचे प्रश्नही त्यांना सोडवता आले नाहीत.
त्यामुळे आता ते अस्तित्वाची लढाई लढत आहेत, अशी टीका जठार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
नीलम्स का वाचवलेत?
महामार्ग चौपदरीकरणाला तुमच्यासारख्यांच्या अडवणुकीमुळे वेळ लागतो. तुम्ही हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड वाचवण्यासाठी नितीन गडकरी यांना कितीवेळा भेटलात. तेव्हा सार्वजनिक कामासाठी हॉटेल आधी तोडा असे का सांगितले नाहीत. मी माझे कासार्डेतील कार्यालय आधी तोडा, असेच अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जनतेसमोर नेत्यांनी आदर्श घालून द्यायचा असतो, असे जठार यांनी म्हटले आहे.