एसटी संपामुळे बुडाले कर्मचाऱ्यांचे २५० कोटी; आंदोलन लांबले, प्रत्येकी दीड ते चार लाखांचे नुकसान
By नितीन जगताप | Published: April 14, 2022 05:32 AM2022-04-14T05:32:41+5:302022-04-14T05:33:53+5:30
एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपर्यंत लांबल्याने, वेतनाअभावी कर्जाचे हप्ते थकून ते कर्जबाजारी झाले आहेत.
नितीन जगताप
मुंबई :
एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपर्यंत लांबल्याने, वेतनाअभावी कर्जाचे हप्ते थकून ते कर्जबाजारी झाले आहेत. विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांचे सुमारे २५० कोटींचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक ते चार लाखांचा फटका बसला, अशी माहिती कामगार वर्तुळातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
अनेक कर्मचाऱ्यांचे वर्षातील २४० हजेरी दिवस पूर्ण होत नसल्याने, त्यांना या वर्षीची ग्रॅच्युएटी मिळणार नाही, तसेच त्यांच्या पीएफ खात्यात पाच महिन्यांचे व्याज जमा होणार नाही. विमा पॉलिसीचे हप्ते थकले आहेत. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर रुजू झालो. मला ५५ हजार रुपये वेतन आहे, पण संपामुळे २.५० लाख रुपयांचे नुकसान झाले. मला खर्चासाठी मित्रांकडून उसनवारी करावी लागली.
४०,२१९ कर्मचारी कामावर हजर
- न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी रुजू होत असून, बुधवारपर्यंत ८१ हजार ६८३ कर्मचाऱ्यांपैकी ४० हजार २१९ कर्मचारी उपस्थित होते, अद्यापही ४१ हजार ४६४ जण संपात सहभागी आहेत.
- ११ हजार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
"मी २०१९ मध्ये एसटी बँकेतून ५ लाखांचे कर्ज घेतले. मला १०,५०० रुपयांचा हप्ता आहे, पण मी पाच महिन्यांपासून संपात असल्याने कर्जाचे हप्ते थकले आहेत."
- एसटी कर्मचारी
"न्यायालयाच्या निर्णयाने मान्य झालेल्या मागण्या पूर्वीच परिवहनमंत्री अनिल परब यांनी मान्य केल्या आहेत. या आंदोलनात कर्मचाऱ्यांना खूप मोठी आर्थिक झळ बसणार आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून काहीतरी आर्थिक साहाय्य होईल, असा मार्ग निघाला पाहिजे."
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस,
महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस.
कष्टकऱ्यांचे दीड ते दोन कोटी गेले कुठे?
- संपातील एसटी कर्मचाऱ्यांकडून अंदाजे दीड ते दोन कोटींची रक्कम जमा करण्यात आली.
- यामध्ये कारवाई झालेल्या ११ हजार कर्मचाऱ्यांकडून ५००, तर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये घेण्यात आले.
- त्यांची संख्या ४० हजारांहून अधिक आहेत. ती रक्कम दीड ते दोन कोटींहून अधिक असून हे पैसे गेले कुठे, असा सवाल एका एसटी कर्मचाऱ्याने विचारला.