अडीच हजार सीसीटीव्ही ‘आंधळे’
By admin | Published: January 12, 2015 03:39 AM2015-01-12T03:39:36+5:302015-01-12T03:39:36+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने घातपात व गैरकृत्याला प्रतिबंधासाठी अत्यावश्यक असणारे क्लोज सर्किट (सीसी)टीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असली
जमीर काझी, मुंबई
सुरक्षेच्या दृष्टीने घातपात व गैरकृत्याला प्रतिबंधासाठी अत्यावश्यक असणारे क्लोज सर्किट (सीसी)टीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असली तरी त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह राज्यभरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांपैकी तब्बल २५३७ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामध्ये पोलिसांसह विविध शासकीय विभाग व सार्वजनिक उपक्रमातील ११५९ कॅमेऱ्यांचा समावेश आहे.
सीसीटीव्हीबाबतचे अपुरे ज्ञान व दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भविलेली असून, या निरोपयोगी ‘आंधळ्या’ कॅमेऱ्यांमुळे शासनाची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ या उक्तीप्रमाणे झालेली आहे. मुंबई व पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणचे ६४८ कॅमेरे केवळ दिखाव्यासाठी उभे असल्याचे गृह विभागातील अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
राज्य सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या आढाव्यामध्ये ही बाब चव्हाट्यावर आली आहे. महाराष्ट्रात सध्या ८६,६३३ सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यापैकी ८४ हजार ९६ कॅमेरे कार्यान्वित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २६/११च्या घटनेनंतर घोषणा केलेला मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प अद्याप कागदावरच असला तरी उपरोक्त अस्तित्वात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांच्या सद्य:स्थितीबाबतचा अहवाल गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. त्याची प्रत ‘लोकमत’ला मिळालेली असून, पोलिसांच्या विविध ४३ घटकांतर्गत खासगी, सार्वजनिक उपक्रम व सरकारी अशा तीन विभागांमध्ये वर्गवारी करून ३१ डिसेंबरपर्यंतची माहिती नमूद केलेली आहे. त्यानुसार एकूण ८६ हजार ६३३ कॅमेऱ्यांपैकी ८० टक्क्यांवर म्हणजे ६१,०१० इतके खासगी कॅमेरे बसविण्यात आलेले असून, त्यापैकी ५९,६३२ चालू तर १,३७८ बंद अवस्थेत आहेत. सार्वजनिक उपक्रमांतर्गत एकूण १४,९०२ कॅमेऱ्यांपैकी ५२९ बंद पडलेले आहेत, तर सरकारी विभागातील १० हजार ९१ कॅमेऱ्यांपैकी ६३० कॅमेरे दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत असल्याचे नमूद केलेले आहे.