सरकारने काढले २५०० कोटींचे कर्जरोखे
By admin | Published: October 7, 2016 05:34 AM2016-10-07T05:34:59+5:302016-10-07T05:34:59+5:30
महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे २५०० कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले असून, यातून मिळालेल्या रकमेचा विनियोग विविध विकासकामांसाठी करण्यात येईल
मुंबई : महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे २५०० कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले असून, यातून मिळालेल्या रकमेचा विनियोग विविध विकासकामांसाठी करण्यात येईल, अशी माहिती वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
या कर्जरोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेत लिलावाने करण्यात येणार आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येणार आहे. लिलावाचे बिडस १० आॅक्टोबर रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्युशन, (ई-कुबेर) सीस्टिमनुसार सादर करावयाचे आहेत. अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दर साल दर शेकडा कुपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक १३ एप्रिल आणि १३ आॅक्टोबर रोजी करण्यात येईल. शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. (प्रतिनिधी)