26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 07:38 AM2022-11-26T07:38:22+5:302022-11-26T07:39:17+5:30
समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही या महानगरावरील दहशतवादाचे सावट कायम आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. पोलिस जवानांनी हा हल्ला परतवून लावत नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घालत अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडले. पुढे त्याला फासावर चढविण्यात तपास यंत्रणांना यश आले. या हल्ल्यात १८ पोलिस जवानांना वीरमरण आले. मुंबईवरील या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील एनएसजी कमांडोंच्या धर्तीवर मुंबईत शक्तिशाली अशा शीघ्र कृती दल आणि फोर्स वनची स्थापना करण्यात आली. अतिरेकी हल्ला परतवून लावण्याचा नियमित सराव या पथकांकडून करण्यात येतो. तसेच मुंबई पोलिस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि यंत्रसामुग्रीने सज्ज करण्यात आले आहे.
या हल्ल्याच्या स्मृतिदिनी मुंबई पोलिस जिमखान्यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, हॉटेल ताज, हुतात्मा स्मारक, गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणांसह शहरातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालये, तसेच सामाजिक संस्थांकडून हल्ल्यातील शहीद जवानांना मानवंदना देत आदरांजली वाहण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त कार्यालयात अभिवादन संचलन कार्यक्रम -
या हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात “अभिवादन संचलन कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता.