अंबाबाई चरणी अर्पण होणार 26 किलोची सुवर्णपालखी

By admin | Published: March 16, 2017 03:32 PM2017-03-16T15:32:02+5:302017-03-16T15:36:38+5:30

करवीर निवासिनी श्री अंबाबाईसाठी तब्बल 26 किलोंची सुवर्णपालखी सजली आहे.

26-kg goldfish will be offered to Ambabai Charan | अंबाबाई चरणी अर्पण होणार 26 किलोची सुवर्णपालखी

अंबाबाई चरणी अर्पण होणार 26 किलोची सुवर्णपालखी

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 16 -  कोल्हापूरच्या चारही दिशांच्या रक्षकदेवता, कपिलमुनी, श्रीयंत्र, गौरी शंकर, कीर्तीमुख अशी शुभचिन्हे, ऐश्वर्याचे प्रतिक असलेला हत्ती, मनीकाम केलेले मोरपक्षी आणि खड्यांनी त्यावर चढवलेला डौल, पानाफुलांची वेलबुट्टी, कलाकुसरीचे नक्षीकाम अशा शुभचिन्हांनी आणि देवतांच्या अधिष्ठांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईसाठी तब्बल 26 किलोंची सुवर्णपालखी सजली आहे. गुढीपाडव्यानंतरचा शुभदिवस पाहून पालखी अंबाबाईस अर्पण करण्यात येणार आहे.  
 
अंबाबाई मूर्तीच्या पुर्णप्रतिष्ठापनेला तीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दीड वर्षापूर्वी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टच्यावतीने श्री अंबाबाईस सोन्याची पालखी अर्पण करण्याचा संकल्प करण्यात आला. खासदार धनंजय महाडीक यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या ट्रस्टने भाविकांना सोने अर्पण करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 27 हजार देणगीदारांनी दिलेल्या २६ किलो २३ कॅरेट सोन्यामध्ये अंबाबाईच्या लाकडी पालखीला सोन्याच़्या पत्र्याचा नक्षीदार मुलामा देण्यात आला. पालखीचे हॉलमार्कींगसुद्धा करण्यात आले आहे. 
 
ट्रस्टकडे एकूण २६ किलो सोने जमा झाले होते त्यापैकी साडेतीन किलो सोन्यात मोर्चेल आणि चव-या घडवण्यात आल्या व त्या नवरात्रौमध्येच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या. उर्वरीत साडे बावीस किलो सोन्यामध्ये सुवर्णपालखी साकारण्यात आली आहे. उद्यम नगरातील गणेश चव्हाण, महेश चव्हाण, योगेश चव्हाण आणि अभिजीत चव्हाण या बंधूंनी पालखी साकारली आहे. त्यांना समीर पत्रा आणि भूभाई यांचे सहकार्य लाभले. 
 
देवतांचे अधिष्ठान 
साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईच्या या पालखीवर चारही बाजूंनी कोल्हापुरातील प्रमुख देवतांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत.  महार्गलभैरव, सरस्वती, त्र्यंबोली देवी, जोतिबा, लक्ष्मीविष्णू, कपिलमुनी, दासमारुती, वेताळ भैरव, बटुक भेरव, (चंबुखडी), कालभैरव, दासगरुड, श्री दत्त, वाणी ब्रम्हा, कात्यायनी, गौरीशंकर आणि पालखीच्या मध्यभागी श्रीयंत्र प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. 
 
मीनाकाम आणि खड्यांचे कोंदण 
संपूर्ण पालखीवर ऐश्वर्याचे प्रतिक असलेले हत्ती आणि पानाफुलांची वेलबुट्टी कोरण्यात आली आहे. पालखीच्या दोन्ही बाजूला कीर्तीमुख आहेत. चार बाजूंना मिनाकाम केलेले मोर आहेत त्याच्यावर पांढ-या खड्यांचे कोंदण आहे. पालखीच्या खालच्या नक्षीकामावरदेखील लाल खडे लावण्यात आले आहेत. पालखीची कलाकुसर कशी असावी याचे डिझायनिंग भरत ओसवाल यांनी केले आहे. 
 
शनिवारी पालखी शुद्धीकरण 
ही सुवर्णपालखी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री अंबाबाईला अर्पण करण्यात येणार होती. मात्र चारही पीठांचे शंकराचार्य त्या दिवशी उपस्थित राहू शकत नसल्याने पालखी अर्पण करण्याचा विधी पुढे ढकलण्यात आला आहे.  शनिवारी (17 मार्च) मंदिरात केवळ पालखीचे शुद्धीकरण आणि गुढीपाडव्यानंतर अक्षयतृतीया किंवा त्याआधीचा चांगला दिवस बघून पालखी अर्पण केली जाईल, अशी माहिती कार्याध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली.
 

Web Title: 26-kg goldfish will be offered to Ambabai Charan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.