नीरा-नृसिंहपूरसाठी २६० कोटी
By admin | Published: March 3, 2016 04:53 AM2016-03-03T04:53:44+5:302016-03-03T04:53:44+5:30
पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र निरा-नृसिंहपूर व कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील विकासकामे मंजूर आराखड्यानुसार तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री
मुंबई : पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र निरा-नृसिंहपूर व कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील विकासकामे मंजूर आराखड्यानुसार तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या कामांसाठी अनुक्रमे २६०.८६ कोटी आणि १२१.६४ कोटी रुपये खर्च करण्यास त्यांनी मान्यता दिली.
या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस सहकारमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार उल्हास पाटील, इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, वनविभागाचे सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार आदी अधिकारी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या ‘कन्यागत महापर्वकाळ’ सोहळ्याकरिता १२१.६४ कोटी रुपयांच्या निधीस मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, या आराखड्यानुसार करावयाच्या विविध विकासकामांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर, श्रीक्षेत्र निरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या देवस्थान विकासासाठी २६० कोटी ८६ लाख रुपयांचा विकास आराखडा जिल्हा समितीने शिखर समितीकडे सादर केला आहे.
सदर आराखड्यास राज्यस्तरीय शिखर समितीची मान्यता घेऊन तातडीने कामे पूर्ण करण्यात यावी, असे आदेश फडणवीस यांनी दिले. या वेळी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर व श्रीक्षेत्र निरा-नृसिंहपूर ता. इंदापूर पुणे यांचे सादरीकरण करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)