राज्यात २६ हजार जणांची ‘घर वापसी’
By Admin | Published: January 14, 2015 06:31 AM2015-01-14T06:31:32+5:302015-01-14T06:31:32+5:30
संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांमुळे देशभर वादळ उठलेले असताना महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ हजार ५३७ व्यक्तींनी धर्मांतर
जमीर काझी, मुंबई
संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांमुळे देशभर वादळ उठलेले असताना महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ हजार ५३७ व्यक्तींनी धर्मांतर केल्याची माहिती गृह विभागाने एका अहवालाद्वारे राज्य सरकारला दिली आहे. यापैकी २६ हजार ३८८ जणांनी २००९ ते २००१२ या काळात खिश्चन धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश (घर वापसी) केला. तर १४९ जणांनी हिंदू धर्मातून अन्य धर्मांत स्वच्छेने प्रवेश केला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुरोगामी राज्य म्हणून देशभरात ख्याती असलेल्या महाराष्ट्रात धार्मिकतेचा पगडा सुप्तपणे वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव यामुळे समोर आले आहे.
माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत धर्मांतराच्या एकूण सहा घटना घडल्या असल्या तरी अन्य धर्मांत गेलेल्यांनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची त्यात एकही घटना नाही.
आर्थिकदृष्ट्या हलाखीत असलेल्या खिश्चन व मुस्लीम धर्मातील स्त्री-पुरुषांना आर्थिक आमिष दाखवून पुन्हा ‘घर वापसी’ करण्याचा कार्यक्रम काही हिंदुत्वत्वादी संघटनांकडून केला जात आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या एका धार्मिक सोहळ्यातून ही बाब चव्हाट्यावर आल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशात विरोधी पक्षांनी मोठा गदारोळ केला होता. या विषयावरून संसदेचे कामकाज बंद पाडले होते. त्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या धर्मांतराच्या, मूळ धर्मात परत जाण्याच्या घटनांबाबतचा अहवाल गृह विभागाकडून मागविला होता.
त्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २००९ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये राज्यात विविध ठिकाणी धर्मांतराच्या एकूण ६ घटना घडल्या आहेत. त्यांत एकूण २६,३८८ जणांनी पुन्हा विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. हे धर्मांतराचे कार्यक्रम रत्नागिरी, सांगली, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी झालेले असून, यामध्ये खिश्चन धर्मात गेलेल्या स्त्री-पुरुषांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
यापैकी २००९ साली ‘घरवापसी’च्या सर्वाधिक ४ घटना घडल्या असून, त्यामध्ये तब्बल २४,४७६ नागरिक सहभागी होते. २०१० मध्ये २ घटनामध्ये १,५६२ जणांनी घरवापसी केली. तर २०१२ मध्ये एका धार्मिक सोहळ्यातून ३५० स्त्री-पुरुषांना हिंदू धर्मात घेण्यात आले. २०११, २०१३ व २०१४ या वर्षांमध्ये ‘घरवापसी’ची एकही घटना झाली नाही.
सहा वर्षांमध्ये स्वच्छेने धर्मांतर करण्याच्या एकूण २६ घटना घडल्या असून, त्यातून १४९ स्त्री-पुरुषांनी हिंदू धर्माचा त्याग केला आहे. त्यापैकी १६ घटनांमध्ये १६ हिंदूंनी व एका ख्रिश्चनाने इस्लामचा स्वीकार केला. तर विविध ठिकाणी झालेल्या १० घटनामध्ये १३२ हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नोंदी पोलिसांच्या दप्तरी आहेत. यातील सर्व घटना स्वच्छेने झाल्या असून, आमिष अथवा जबरदस्तीने एकही घटना घडली नसल्याने संबंधित घटनांबाबत कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेली ही आकडेवारी असून, प्रत्यक्षात धर्मांतर केलेल्यांची संख्या त्याहून कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.