ज्यात सहा महिन्यांच्या कालावधीत स्वाइन फ्ल्यूचे २६१ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 01:17 AM2017-06-30T01:17:03+5:302017-06-30T01:17:03+5:30
राज्यात १ जानेवारी ते २७ जून २०१७ या कालावधीत स्वाइन फ्ल्यू १ हजार ७२० रुग्ण आढळले. तसेच त्यातील २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे
रालोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १ जानेवारी ते २७ जून २०१७ या कालावधीत स्वाइन फ्ल्यू १ हजार ७२० रुग्ण आढळले. तसेच त्यातील २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेऊन उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने गरजू व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी जानेवारी ते जून या काळात ३० हजार ४६२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. स्वाइन फ्ल्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून ‘आॅसेलटॅमीवीर’ हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील चार शासकीय प्रयोगशाळांमार्फत या आजाराच्या मोफत निदानाची सुविधा करण्यात आली आहे. रेलीगेअर आणि डॉ. लाल पॅथॉलॉजी लॅबसह, अन्य १७ खासगी प्रयोगशाळांना स्वाइन फ्लूच्या निदानाची मान्यता देण्यात आली आहे. पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेता जनजागृतीवर भर द्यावा. खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिले.