२६,१६९ सिंचन विहिरी पूर्ण
By admin | Published: December 10, 2015 02:54 AM2015-12-10T02:54:10+5:302015-12-10T02:54:10+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षाकरिता ३० हजार विहिरी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत २६,१६९ विहिरी पूर्ण झाल्या आहेत
नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षाकरिता ३० हजार विहिरी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत २६,१६९ विहिरी पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षात एक लाख विहिरी व दीड लाक शेततळी तयार करण्याची घोषणा केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरी घेण्यात येतात. त्यानुसार पात्र लाभार्थ्यास विहीरसाठी तीन लाख रुपये इतकी रक्कम अनुज्ञेय आहे.
शासन परिपत्रक ३१ जुलै २०१५ अन्वये तीन वर्षामध्ये घ्यावयाच्या एक लाख विहिरींबाबतच्या नियोजनाचे विभागनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेततळी घेण्यासंदर्भात शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सदस्य डॉ. पतंगराव कदम, अमिन पटेल, डॉ. संतोष टारफे, असलम शेख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)