राज्यात डेंग्यूचे २६२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2016 02:29 AM2016-11-06T02:29:08+5:302016-11-06T02:29:08+5:30
पावसाला सुरुवात झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारखे साथीचे आजार डोके वर काढू लागतात. यंदा राज्यात पाऊस लांबल्याने आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात
मुंबई : पावसाला सुरुवात झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारखे साथीचे आजार डोके वर काढू लागतात. यंदा राज्यात पाऊस लांबल्याने आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात नवीन डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात २६२ डेंग्यूचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या वर्षी १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबरदरम्यान राज्यभरात ५ हजार ६५३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूमुळे २२ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. मुंबईत आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे २२८ रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रांमध्ये मुंबईत यंदा सर्वाधिक म्हणजे ९४१ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले, तर नाशिक येथे ७७५, पुण्यात ५९६ आणि ठाण्यात २९९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. कोल्हापूर जिल्ह्यात २६५, नाशिकमध्ये २५३ आणि पुण्यात १७० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले.
यंदा राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यभरात चिकनगुनियाचे २ हजार २८० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी महापालिका क्षेत्रात २ हजार ५ तर उर्वरित ग्रामीण भागात २७५ रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)
चिकनगुनियाचेही आढळले रुग्ण
डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव हा एडिस डासांपासून होतो. साचलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. राज्यात आॅक्टोबरपर्यंत पाऊस पडत असल्याने आॅक्टोबर महिन्यातही डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबरमध्येही डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
- आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत
नियमित ताप सर्वेक्षण
- तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेत मोफत तपासणी
- अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या ठिकाणी धूरफवारणी अशा प्रकारच्या उपायोजना केल्या जात आहेत.
- नागरिकांना सतर्कतेचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आल आहे.