नवी मुंबईतील २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता

By Admin | Published: July 23, 2016 02:11 AM2016-07-23T02:11:57+5:302016-07-23T02:11:57+5:30

शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

262 minor girls missing from Navi Mumbai | नवी मुंबईतील २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता

नवी मुंबईतील २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दीड वर्षात नवी मुंबईतून २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २३० मुलींना पोलिसांनी शोधून काढले असून, त्यापैकी ९० टक्के मुली प्रेमसंबंधातून पळाल्याचे तपासात उघड झाले आहे.
नेरूळ येथील स्वप्निल सोनावणे (१५) याच्या हत्येनंतर अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणांचा प्रश्न चर्चेत आला आहे. शाळांच्या बाहेर, उद्यानांत तसेच एकांत मिळेल अशा ठिकाणी अल्पवयीन युगुले दिसतात. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून दीड वर्षात ३८९ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली आहेत.
त्यापैकी ३४२ बालकांना शोधून काढण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. २०१५ मध्ये १७२ तर चालू वर्षात ९० मुली बेपत्ता झाल्या होत्या. गेल्या दीड वर्षात २३० बेपत्ता अल्पवयीन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आहे. त्यापैकी सुमारे ९० टक्के मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलेले आहे. १० दिवसांपूर्वीच दिघा येथील महिलेने तिच्या नऊ वर्षांच्या मुलीचे २५ वर्षीय मुलासोबत लग्न लावले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर या महिलेने प्रेमप्रकरणात लहान मुली पळून जातात या चिंतेने तिचे लग्न लावल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यामुळे मुलांप्रमाणेच पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
>२३0 मुलींचा शोध
२०१५ मध्ये १७२ मुली हरवल्या. त्यापैकी १५७ मुलींचा पोलिसांना शोध लागलेला आहे.
२०१६ मध्ये जूनअखेरपर्यंत
९० मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ७३ मुलींचा शोध लागलेला आहे.

Web Title: 262 minor girls missing from Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.