२६५ कंत्राटी डॉक्टरांना केले बडतर्फ
By admin | Published: July 7, 2014 03:48 AM2014-07-07T03:48:41+5:302014-07-07T03:48:41+5:30
पाच मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणाच्या पवित्र्यात असणाऱ्या मॅग्मो संघटनेवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे.
मुंबई : पाच मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणाच्या पवित्र्यात असणाऱ्या मॅग्मो संघटनेवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या २६५ डॉक्टरांना बडतर्फ केले आहे. तर १९४ डॉक्टर रविवारी कामावर रुजू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यभरातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घ्या, अन्यथा जीवनावश्यक सेवा अनुरक्षण कायद्यांर्गत (मेस्मा) कारवाई होईल, असा इशारा सार्वजनिक आरोग्य विभागाने शनिवारी मॅग्मोला दिला होता. मात्र मॅग्मोने याकडे दुर्लक्ष करून आंदोलन सुरूच ठेवले आहे. सरकार मॅग्मोच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहात असताना ही मॅग्मो संघटना आंदोलन मागे घेण्याच्या तयारी दाखवत नसल्यामुळे आता सरकारने कडक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत विनाशर्त आंदोलन मागे न घेतल्यास मॅग्मोच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांना मेस्मा लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या चार वर्षांपासून मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मॅग्मो संघटना विविध स्तरावर आंदोलन करत होती. मात्र त्यांच्या ११ मागण्यांपैकी एकही मागणी अजून पूर्ण झालेली नाही. म्हणूनच १ जून रोजी मॅग्मो संघटनेने राज्यभर काम बंद आंदोलन पुकारले होते. यानंतर ३ जून रोजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तीन मागण्या मान्य करून १० दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर मॅग्मोने आंदोलन स्थगित केले होते. मात्र १ महिना उलटूनही या मागण्या मान्य न झाल्यामुळे १ जुलैपासून मॅग्मोने काम बंद आंदोलन पुकारले आहे. पाच मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मॅग्मोने घेतली असल्याचे मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)