पुणे : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील १४ निवडणूक कार्यालयातून एका दिवसात विक्रमी २२१५ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत जमा झालेल्या एकूण अर्जांची संख्या २६६१वर पोहोचली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून यादी जाहीर न करता अर्ज शुक्रवारी सकाळी थेट उमेदवारांना बोलावून ए व बी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धांदल उडाली. सर्वच निवडणूक कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळलेली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी अकरापासून होती, मात्र सकाळी आठ वाजल्यापासूनच निवडणूक अधिकाºयांच्या केबिन बाहेर उमेदवारांनी रांग लावली होती. अर्ज भरण्याची मुदत ३ वाजता संपली, त्यावेळी अर्ज भरणाºया उमेदवारांची रांग कायम होती. घोले रोड, भवानी पेठ, धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्षांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)