पोलीस कोठडीत २६८ जणांचा अंत
By admin | Published: May 4, 2016 03:05 AM2016-05-04T03:05:42+5:302016-05-04T03:05:42+5:30
विविध गुन्ह्यांप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपींच्या मृत्यूचा आलेख वाढत राहिला आहे. गेल्या सव्वा आठ वर्षांत राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अथवा कोठडीत असलेल्या
- जमीर काझी, मुंबई
विविध गुन्ह्यांप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपींच्या मृत्यूचा आलेख वाढत राहिला आहे. गेल्या सव्वा आठ वर्षांत राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अथवा कोठडीत असलेल्या तब्बल २६८ जणांचा अंत झाला आहे. या वर्षात मार्च अखेरपर्यत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या ताब्यात असताना काहींनी आत्महत्या केली. तर काहींचा तपास अधिकाऱ्यांचा दबाव, मारहाणीमुळे प्रकृती बिघडून त्यांचा शेवट झाला आहे. पोलीस कोठडीतील मृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे जणू ते मृत्यूचे सापळे बनल्याची टीका मानवधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याला प्रतिबंधासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह विविध उपाययोजना राबविण्यात येत असलेतरी त्याला मर्यादा पडत आहेत. त्याचप्रमाणे याप्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) होत असलेल्या तपासाची बहुतांश प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे संशयित आरोपीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास विलंब लागत आहे.
एका घरफोडीच्या गुन्ह्यात मुलुंड पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या अमित राठोड या आरोपीने रविवारी मध्यरात्री शौचालयात स्वत:च्या शर्टने गळफास लावून घेतला. त्यापार्श्वभूमीवर आत्तापर्यंत राज्यभरात पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबतचा आढावा घेतला असता ‘लोकमत’च्या हाती ही धक्कादायक आकडेवारी समोर आली.
२००८ पासून ते मार्च २०१६ पर्यंत म्हणजे सव्वा वर्षांच्या कालावधीत पोलीस कोठडीत एकूण २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१४ मध्ये ४३ तर २०१५ या वर्षांत ३८ तर या वर्षाच्या मार्चअखेरपर्यत ६ जणांचा अंत झाला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील पोलीस कोठडीत घडणाऱ्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून केला जातो. त्याची माहिती दिल्लीतील राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य सरकार व पोलीस महासंचालकांकडे पाठविली जाते. याप्रकरणी नागरी हक्क व संरक्षण विभागाचे अप्पर महासंचालक समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतात. मात्र गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोठडीतील मृत्यूबाबतची बहुतांश प्रकरणे अद्याप रखडलेली आहे. अपुरे मनुष्यबळ व अन्य कामामुळे याबाबत तपास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन
गुन्ह्याच्या तपासाबाबत एखाद्या व्यक्तीला ताब्यात किंवा अटक केल्यानंतर त्याच्याशी करावयाच्या वर्तणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मानवी हक्काबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २४ तासांच्या आत अटक केलेल्या आरोपीची वैद्यकीय चाचणी करुन न्यायालयात हजर करणे. आरोपीच्या नातेवाईकांना माहिती देणे अत्यावश्यक असते. मात्र अनेकवेळा सराईत गुन्हेगाराकडून माहिती काढून घेण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर केला जातो. त्यामुळे मारहाणीमुळे तर काहीवेळा बदनामीच्या भीतीने अनेकांना धक्का बसून कोठडीत मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे मानवधिकार कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते.
‘पाप’ वर्दीवाल्यांच्या माथी...
पोलिसांनी तपासासाठी आणलेल्या कोणाचा रक्तदाब वाढल्याने तसेच कोणी हृदयविकाराच्या धक्क्याने तर बहुतांशजण जुन्या व्याधीमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. मात्र पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांचा अंत झाल्याने त्याचे ‘पाप’ खाकी वर्दीवाल्याच्या माथी पडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.