किसान सभेचा २६ रोजी देशव्यापी ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:29 AM2017-07-18T01:29:48+5:302017-07-18T01:29:48+5:30
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट
- लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २६ जुलै रोजी देशव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सकाळी अकरा वाजता सहा ठिकाणी एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
किसान सभेची राज्य कौन्सिलची बैठक मनमाड, तर राष्ट्रीय कौन्सिलची बैठक जगन्नाथपुरी येथे झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाला. देशात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असून, यासाठी शेतकऱ्यांची सरकारी, सहकारी व खासगी कर्जे माफ करावीत.
स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतमजुरांना दरमहा पेन्शनचा कायदा करावा, आदी मागण्यांसाठी देशव्यापी संप केला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली पुलाची, कसबा बीड, कळे, गारगोटी, कळंबा, इचलकरंजी या ठिकाणी रास्ता रोको करणार असल्याची माहिती गावडे यांनी दिली.