२७ ते ३० तारीख नेहमीच धोक्याची
By admin | Published: June 1, 2016 04:10 AM2016-06-01T04:10:06+5:302016-06-01T04:10:06+5:30
३० मेच्या रात्री पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये लागलेली आग ही येथे लागलेली पहिली आग नाही. येथे अगोदरदेखील आगी लागल्या आहेत. देशातील विविध आयुध निर्माणी कारखाने
नागपूर : ३० मेच्या रात्री पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये लागलेली आग ही येथे लागलेली पहिली आग नाही. येथे अगोदरदेखील आगी लागल्या आहेत. देशातील विविध आयुध निर्माणी कारखाने, दारुगोळा गोदामांमध्ये अनेक वेळा आगी लागल्या आहेत. २९ एप्रिल २००० रोजी सर्वात मोठी आग ही भरतपूर आयुध निर्माणीत लागली होती. यात सुमारे १२ हजार टन स्फोटके व दारुगोळा नष्ट झाला होता. आतापर्यंत लागलेल्या आगींच्या तारखांकडे लक्ष टाकले असता अनेक आगी या महिन्याच्या २७ ते ३० तारखेदरम्यानच लागलेल्या आहेत. २००० सालापासून १५ मोठ्या आगी लागल्या व यातील ७ आगी या २७ ते ३० तारखांच्या मध्ये लागल्या होत्या. हा एक योगायोग असला तरी महिन्याचा शेवट हा आयुध निर्माणींसाठी अशुभच दिसून येत आहे.
हजारो कोटींचे नुकसान, जीवितहानीदेखील
२००० सालापासून आतापर्यंत लागलेल्या आगींमध्ये संरक्षण मंत्रालयाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. विविध आगींमध्ये हजारो टन दारुगोळा नष्ट झाला. आयुध निर्माणी भंडारा येथे २००८ साली लागलेल्या आगीत चार जणांचे मृत्यू झाले होते. २००५ मध्ये येथे लागलेल्या आगीत तिघांचा बळी गेला होता. २००१ मध्ये पठाणकोट दारुगोळा भांडारात लागलेल्या आगीत दोघांचा जीव गेला होता. तर भद्रावती येथे २००५ साली लागलेल्या आगीत एक जण गंभीर जखमी झाला होता. बिर्धवाल दारुगोळा भांडारात २००१ साली लागलेल्या आगीत एकाचा जीव गेला होता व सुमारे सहा हजार टन स्फोटके व दारुगोळा भस्मसात झाला होता.
२००० सालापासूनच्या आगीच्या घटना
२९ एप्रिल २०००केंद्रीय आयुध निर्माणी, कानपूर
२८ एप्रिल २०००भरतपूर लष्करी दारुगोळा भांडार
२९ एप्रिल २००१पठाणकोट दारुगोळा भांडार
३ मे २०००दारुगोळा भांडार, देहू रोड
२९ मे २०००केंद्रीय आयुध निर्माणी, कानपूर
२४ मे २००१बिर्धवाल (राजस्थान) दारुगोळा कोठार
३ जून २००१दारुगोळा भांडार, शाकूरबस्ती, दिल्ली
६ आॅगस्ट २००१जबलपूर आयुध निर्माणी
७ जानेवारी २००२जबलपूर आयुध निर्माणी
३० जानेवारी २००५आयुध निर्माणी भद्रावती
२२ मार्च २००५‘कॅड’, पुलगाव
एप्रिल २००५आयुध निर्माणी भद्रावती
१६ मे २००५आयुध निर्माणी भंडारा
२००८आयुध निर्माणी भंडारा
३० आॅगस्ट २०१०आयुध निर्माणी भंडारा