सोळा उमेदवारांचे २७ अर्ज
By admin | Published: January 18, 2017 06:20 AM2017-01-18T06:20:47+5:302017-01-18T06:20:47+5:30
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.
ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. विभागातून १६ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले आहेत. १८ जानेवारी रोजी या अर्जांची छाननी होणार आहे. काही उमेदवारांनी दोन - दोन अर्ज दाखल केल्यामुळे उमेदवारी संख्या वाढलेली आहे. यातील बहुतांशी अर्ज २० जानेवारीनंतर मागे घेतले जाणार आहेत. त्यानंतरच निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या निश्चित करणे शक्य होणार आहे.
यामध्ये तिसऱ्यांदा नशिब अजमावित असलेले शिक्षक भारतीचे उमेदवार अशोक बेलसरे (बदलापूर) यांचा उमेदवारी अर्ज आहे. भाजपाचा पाठिंबा मिळवून शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू (बदलापूर) निवडणूक रिंगणात आहेत. शिक्षक परिषदेने उमेदवारी नाकारल्यामुळे या मतदार संघाचे विद्यमान आमदार रामनाथ मोते (उल्हासनगर) यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारांसह सेनेच्या पाठिंब्यावर शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे (अंबरनाथ), शेकापचे नेते पुरोगामी शिक्षक आघाडीचे बाळाराम पाटील (रायगड) यांचा उमेदवारी अर्ज आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे नरसू पाटील (उरण) आदींसह अपक्ष उमेदवार केदार जोशी (ठाणे), कृष्णा म्हात्रे, काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे (ऐरोली), राजाराम पाटील (कल्याण), मिलिंद कांबळे (उल्हासनगर), आंबादास काळे (विचुंबे, पनवेल), उस्मान रोहेकर (रोहा), दिलीप गव्हाळे (वासिंद), तुळशिराम जाधव (भांडूप) इत्यादी १६ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले.
या उमेदवारी अर्जांची छाननी कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयातील समिती सभागृहात होणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेपासून छाननी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर देशमुख व सहाय्यक निर्णय अधिकारी शिवाजी काटबाणे यांच्या नियंत्रणात ती होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
>निवडणूक निरीक्षकपदी डॉ. जगदीश पाटील
नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या वतीने नुकताच द्विवार्षिक निवडणूक २०१७ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकपदी डॉ. जगदीश पाटील (भा.प्र.से.) महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम यांची निवड करण्यात आली आहे. उपायुक्त (विकास) दालन, विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर येथे कार्यालयीन वेळेत पाटील उपलब्ध राहतील असे स्पष्टीकरण सहा. निवडणूक अधिकाऱ्यांनी केले.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघामधील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये माध्यम प्रामाणिकरण व सनियंत्रण समिती, स्थायी समिती, तक्रार निरीक्षण कक्ष तसेच कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील विशेष चित्रीकरण पथके आणि भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण विभाग मतदार संघातील तक्रार निरीक्षण कक्ष
कोकण विभाग - प्रभारी अधिकारी दीपक वानखेडे,
नायब तहसीलदार,विभाग आयुक्त कार्यालय,
कोकण भवन, नवी मुंबई
पालघर - प्रभारी अधिकारी किरण महाजन,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी,पालघर
ठाणे- प्रभारी अधिकारी मनोज मुरकर, जनसंपर्क अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे
रायगड- प्रभारी अधिकारी रवींद्र चव्हाण, नायब तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड
रत्नागिरी - प्रभारी अधिकारी अर्चना गोखले, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी
सिंधुदुर्ग - प्रभारी अधिकारी प्रवीण खाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग