२७ दिवसांनतर आदिवासी महिलेचा मृतदेह सापडला; पतीविरुध्द खुनाचा गुन्हा
By admin | Published: August 31, 2016 06:48 PM2016-08-31T18:48:46+5:302016-08-31T18:48:46+5:30
तालुक्यातील पिंगळी शेतशिवारातील रखवालदार आदिवासी वृध्देचा मृतदेह तब्बल २७ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत याच परिसरात आढळून आला.
ऑनलाइन लोकमत
संग्रामपूर, (जि.बुलडाणा), दि. 31 - तालुक्यातील पिंगळी शेतशिवारातील रखवालदार आदिवासी वृध्देचा मृतदेह तब्बल २७ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत याच परिसरात आढळून आला. याप्रकरणी मंगळवारी रात्री सोनाळा पोलिसांनी मृतकच्या पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. सोनाळा येथील टिन्नू वर्मा यांच्या पिंगळी शिवारातील शेतात मधूकर भास्कर हे आदिवासी कुटुंब रखवालदार म्हणून आहे. या कुटुंबातील कलाबाई मधूकर भास्कर (वय ६०) ह्या पतीसोबत भांडण झाल्याने गेल्या २२ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने २७ आॅगस्ट रोजी सोनाळा पोलिस स्टेशनला दिली होती. दरम्यान ह्या बेपत्ता असलेल्या वृध्देचा मृतदेह २७ व्या दिवशी कुजलेल्या व अवयव विखुरलेल्या अवस्थेत २९ आॅगस्टच्या रात्री १० वाजेदरम्यान शेतात जात असताना कैलास गुजर नामक शेतक-याला दिसून आला. सदर शेतक-याने सोनाळा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सोनाळा पोलिस स्टेशनचे ३० पोलिसांचे पथक तसेच डिवायएसपी राजेंद्र साळुंके यांनी रात्री १० वाजताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी मंगळवारी रात्री वृध्द महिलेचा पती मधूकर भास्कर याचेविरुध्द कलम ३०२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस शोध घेत आहेत. तपास डिवायएसपी राजेंद्र साळुंके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुनिल बडगुजर करीत आहेत.