मुंबईतील २७ टक्के पाण्याचा हिशेब नाही
By Admin | Published: March 15, 2016 01:42 AM2016-03-15T01:42:08+5:302016-03-15T01:42:08+5:30
मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे
मुंबई : मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे नसल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईत पाणीगळतीमुळे ७०० दशलक्ष लीटर तर १६० दशलक्ष लीटर पाण्याची टँकर लॉबीकडून चोरी होते. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फोडून पाणीचोरी होत असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना भाई गिरकर, राहुल नार्वेकर, आनंद ठाकूर, हेमंत टकले आदी सदस्यांनी मांडली. यावर उत्तर देताना रणजित पाटील म्हणाले की, ‘महापालिकेच्या विशेषत: मुंबई शहरातील जलवाहिन्या शंभर वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत १५० किमी लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या असून, जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व देखभालीचा सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
यावर उपाययोजना करण्यासाठी जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत सेवा सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत आहे. वर्षभरात ३९ हजार ९५६ गळत्या शोधून दुरुस्त करण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबई उपनगरात नळजोडण्यांवर ३ लाख ७० हजार मीटर बसवलेले आहेत, तर १ लाख जोडण्यांवर मीटर नसल्याचे पाटील यांनी सांगितले.