२७ शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, निवडणूक आयोगाची दखल, पडताळणी टाळणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:50 AM2017-11-26T02:50:02+5:302017-11-26T02:50:10+5:30
मतदार याद्यांची नव्याने पडताळणी करण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणा-या जिल्ह्यातील २७ प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
यवतमाळ : मतदार याद्यांची नव्याने पडताळणी करण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणा-या जिल्ह्यातील २७ प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. शनिवारी व्हीसीद्वारे निवडणूक निर्णय अधिकाºयांशी संवाद साधताना त्यांनी आदेश दिले.
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात मतदार यादी पुनर्रीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांची केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना आयोगाने प्रशिक्षण दिले आहे. स्मार्ट फोनचा वापर करून मतदारांच्या घराचे अक्षांश, रेखांशही संग्रहित केले जाणार आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनीकुमार यांनी व्हीसीद्वारे राज्यातील निवडणूक निर्णय अधिकाºयांशी संवाद साधला.
व्हीसीमध्ये राळेगावचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी त्यांच्या मतदारसंघातील २७ शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करणार नाही, अशी भूमिका घेऊन कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे अश्विनीकुमार यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे मतदार नोंदणी रखडल्याने या २७ जणांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०मधील कलम २९ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१मधील कलम १३४ आणि भारतीय दंड संहितेचे कलम १९८८नुसार संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याचेही स्पष्ट केले.
व्हीसीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी आता या शिक्षकांविरुद्ध भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५०मधील कलम ३२नुसार आणखी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी शनिवारी व्हीसीद्वारे आढावा घेतला. त्यांनी संबंधितांविरूद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार लवकरच पुढील कारवाई केली जाईल.
- संदीपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी, राळेगाव