२७० वाळू साठ्यांचे प्रस्ताव
By admin | Published: June 13, 2016 11:13 PM2016-06-13T23:13:32+5:302016-06-13T23:15:58+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील तहसीलदारांकडून २७० वाळूसाठ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़ पुढील
गौण खनिज: ग्रामसभांचे ठराव घेणार; १८ वाळू साठ्यांचीच विक्री
अहमदनगर : जिल्ह्यातील तहसीलदारांकडून २७० वाळूसाठ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़ पुढील तीन महिन्यांत ही प्रक्रिया करून लिलावासाठी आॅनलाइन बोली लावली जाणार आहे़
नगर जिल्ह्यातील पाथर्डी व नगर तालुका वगळता इतर १२ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वाळू आहे़ नदीपात्रातील वाळू पट्टयांची विक्री करण्यासाठी आॅनलाइन बोली लावण्यात येते़ ठेकेदार बोली लावतात़ सर्वाधिक बोली बोलणाऱ्यांना वाळू पट्टा दिला जातो़ त्यानंतर त्याला वाळू उपसता येते़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार मागील वर्षी ३०४ पैकी १८ वाळू पट्टयांचीच फक्त विक्री झाली़ उर्वरित वाळूसाठ्यांची विक्री झाली नाही़ चालू आर्थिक वर्षात वाळू पट्टयाची विक्री करण्याची प्रक्रिया गौण खनिज विभागाने सुरू केली असून, तहसीलदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत़ महिनाभरात २७० प्रस्ताव दाखल झाले आहेत़
तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून नदीपात्राचे सर्वेक्षण करण्यात येते़ त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर वाळू विकायची किंवा नाही, यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते़
ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय पर्यावरण समितीसमोर सादरीकरण केले जाते़ समितीत चर्चा होऊन अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हास्तरीय प्राधिकरणकडे पाठविण्यात येतात़ प्राधिकरणकडून मंजुरी मिळाल्यानंतर वाळूसाठी आॅनलाइन बोली लावली जाणार आहे़
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३४ वाळू साठ्यांची घट झाली असून, त्याची कारणे भूजल सर्वेक्षण विभागाकडून शोधली जाणार आहेत. त्यात ही संख्या वाढू किंवा कमी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले़
(प्रतिनिधी)