शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी २७०.१४ कोटींचा निधी
By admin | Published: October 19, 2016 03:39 AM2016-10-19T03:39:39+5:302016-10-19T03:39:39+5:30
अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती.
हितेन नाईक,
पालघर- पालघर जिल्ह्यासह अन्य चार जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती. तसेच भातिपकांचे विशेषत: बागायती शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ४२४८.८९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यापैकी २७०.१४ कोटींचा निधी पालघर जिल्ह्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या वेळी मच्छीमारांच्या तोंडाला मात्र शासनाने पाने पुसल्याने मच्छीमारा मध्ये नाराजी पसरली आहे.
जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू यांसह अन्य शेती उत्पादनांचं नुकसान लक्षणीय होतं. या गारपीटीमध्ये नुकसान झालेल्या राज्यभरातील शेतकरी व अन्य आपदग्रस्तांना विशेष बाब म्हणून शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली असून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या विशेष प्रयत्नांतून पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी २७०.१४ कोटींचा विशेष निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याला ३६२४.५१ कोटी पालघर जिल्ह्याला २७०.१४, नागपूर जिल्ह्याला ३२८.७८, भंडारा जिल्ह्याला २५.११ व चंद्रपूर जिल्ह्याला ०.३५ लाख असा एकूण ४२४८.८९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जिल्हयात शेती उत्पादनांचे मोठे नुकसान झाले होते तर काही ठिकाणी जिवीतहानी-वित्तहानीही झाली होती. कोकणातील रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातील आंबा, चिकू व अन्य बागायती फळ पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं होतं.