२७२७ थकबाकीदारांना कर विभागाच्या जप्तीच्या नोटिसा

By admin | Published: February 9, 2017 06:27 PM2017-02-09T18:27:29+5:302017-02-09T18:27:29+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने हजार, पाचशेच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१६ मधील कालावधीत सुमारे ७५ कोटींची करवसुली केली.

2727 Notice of seizure of tax department to defaulters | २७२७ थकबाकीदारांना कर विभागाच्या जप्तीच्या नोटिसा

२७२७ थकबाकीदारांना कर विभागाच्या जप्तीच्या नोटिसा

Next

राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भार्इंदर, दि. 9 - मीरा-भार्इंदर महापालिकेने हजार, पाचशेच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१६ मधील कालावधीत सुमारे ७५ कोटींची करवसुली केली. या कराचा भरणा करण्यासाठी पालिकेने जोरदार मोहीम राबविली होती. वेळोवेळी आवाहन तसेच पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करूनही ज्यांनी अद्याप कराचा भरणा केलेला नाही, अशा २७२७ थकबाकीदारांना कर विभागाने जप्तीच्या अंतिम नोटीसा बजावल्या आहेत.

केंद्राने मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा ८ नोव्हेंबरला रद्द केल्या. त्यावेळी राज्य सरकारने पालिकेला रद्द केलेल्या नोटा कराच्या माध्यमातून स्वीकारण्यासाठी ९ नोव्हेंबरला अनुमती दिली. त्याआधारे तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी करवसुलीसाठी कार्यालयीन वेळ वाढून लोकांना त्वरित कर भरण्याचे आवाहन केले. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांमार्फत घरोघरी आवाहन मोहीम राबविण्यात आली. तसेच प्रभागनिहाय पथके तयार करून त्यांना थकबाकीदारांच्या दारी धाडण्यात आले. थकबाकीदारांना कराचा भरणा करण्यासाठी प्रवृत्त करून तेथेच कराची वसुली पथकाद्वारे सुरु करण्यात आली. यामुळे कर वसुलीचा निर्देशांक वाढू लागला. कराचा भरणा करण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही, अशा थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यात शाळेपासून काही रुग्णालये, भार्इंदर रेल्वे स्थानक आदींचा समावेश आहे.

९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरच्या करवसुली मोहिमेंतर्गत पालिकेने सुमारे ७५ कोटींचा कर वसूल केला. तत्पूर्वी पालिकेने १५ कोटींचा कर १ एप्रिल ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान वसूल केला होता. अवघ्या पावणेदोन महिन्यांत पालिकेने एकूण १९० कोटींच्या उद्दिष्टापैकी ४० टक्के करवसुली केली. परंतु ३१ डिसेंबरनंतरही ज्या मालमत्ता धारकांनी अद्याप कराचा भरणा केलेला नाही, अशा २७२७ मालमत्ताधारकांना पालिकेने मालमत्ता जप्तीच्या अंतिम नोटिसा धाडल्या आहेत. यात निवासी व वाणिज्यिक मालमत्ताधारकांचा समावेश असून, त्यांच्याकडे सुमारे ६५ कोटींहून अधिक कर थकीत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सुमारे १०० कोटींचा कर थकीत असून, १०० टक्के कर वसुलीसाठी प्रशासनाकडे केवळ पावणेदोन महिनेच शिल्लक आहेत.

या कालावधीत किमान ९० टक्के कर वसुलीसाठी कर विभागाला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांना त्वरीत कर जमा करावा लागणार आहे. थकीत करप्रकरणी पालिकेची जप्तीची कारवाई पहिल्यांदाच होत आहे. यात प्रभाग क्रमांक १ मध्ये ३२५, दोन मध्ये २५०, तीनमध्ये २३०, चारमध्ये ४५४, पाचमध्ये १ हजार १८, सहामध्ये ४५० थकबाकीदारांचा समावेश आहे. या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता कर विभागाकडुन वर्तविण्यात आली आहे.

Web Title: 2727 Notice of seizure of tax department to defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.