रेल्वे स्थानकावर दारूच्या २७४ बाटल्या पकडल्या
By admin | Published: December 29, 2016 08:17 PM2016-12-29T20:17:08+5:302016-12-29T20:17:08+5:30
दक्षिण एक्स्प्रेसमधील संबंधित महिलांना अटक करून त्यांच्याकडून दारूच्या २० हजार ६० रुपये किमतीच्या २७४ बाटल्या जप्त केल्या
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - दक्षिण एक्स्प्रेसने काही महिला चंद्रपूरला दारुची तस्करी करीत असल्याच्या गुप्त माहितीवरुन लोहमार्ग पोलिसांनी दक्षिण एक्स्प्रेसमधील संबंधित महिलांना अटक करून त्यांच्याकडून दारूच्या २० हजार ६० रुपये किमतीच्या २७४ बाटल्या जप्त केल्या आहेत.
रंजिता विजय जाट (३५), पुनम शंभु जाट (३५) आणि पिरवा अर्जुन गोठिया (३७) रा. मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. लोहमार्ग पोलिसांना काही महिला दक्षिण एक्स्प्रेसने दारुची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक खुशाल शेंडगे, प्रविण भिमटे, योगेश धुरडे, रोशन मगरे यांनी महिला पोलिसांच्या मदतीने दक्षिण एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी मागील जनरल कोचमध्ये तिन महिला संशयास्पद अवस्थेत आढळल्या. त्यांच्याजवळ वजनदार बॅग होत्या. त्यात आॅफिसर चॉईस कंपनीच्या ९० मिलिलीटरच्या २७० बाटल्या, बॉम्बे व्हिस्कीच्या ४ बाटल्या अशी एकुण २० हजार ६० रुपयांची दारु होती. अटक करण्यात आलेल्या महिलांविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.