२७६ बेपत्ता मुलांचा पोलिसांकडून शोध
By admin | Published: July 26, 2016 09:40 PM2016-07-26T21:40:56+5:302016-07-26T21:40:56+5:30
एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे
ऑनलाइन लोकमत
लातूर : एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे लातूर पोलिसांनी २०१० नंतरच्या मिसिंगच्या तक्रारींचा फेरविचार करुन, बेपत्ता मुलांचा शोध नव्याने हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २७६ मुले-मुली बेपत्ता असून, ती सर्व जाती-धर्मातील आहेत.
लातूर जिल्ह्यातून २०१३ ते जून २०१६ अखेरपर्यंत २ हजार ५४ मुले-मुली हरवल्याची तक्रार त्या-त्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील २७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यामध्ये १५३ मुलांचा समावेश असून, या बेपत्ता मुलांचा लातूर पोलिस पुन्हा नव्याने शोध घेत आहेत. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दितील ग्रामीण आणि शहरी भागातून मुले-मुली कुटुुंबियांना वेगवेगळे कारण सांगत घराबाहेर पडली आहेत. यातील काही मुले-मुली हे कालांतराने घरी परतली आहेत.
यासाठी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या ‘मुस्कान आॅपरेशन’च्या माध्यमातून पोलिसांनी या मुलांचा शोध लावला आहे. मात्र सन २०१३ पासून गायब असलेल्या एकूण २७६ मुला-मुलींचा शोध लावण्यात कुटुंबिय आणि पोलिस प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. हे मुले-मुली नेमके कोठे आहेत? याचा साधा मागमूसही आतापर्यंत पोलिसांना लागला नाही. रविवारी लातुरात आलेले एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेचा लातूर पोलिस पुनर्विचार करत आहे. पुन्हा त्या बेपत्ता मुला-मुलींचा शोध नव्याने सुरु केला आहे.
यासाठी खास मोहिम राबविण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. मराठवाड्यातील बेपत्ता १०० मुलांपैकी लातूर जिल्ह्यातील किती मुलांचा यात समावेश आहे. याचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)