२८ दिवस पाण्याविना, मागासवर्गीयांची अवहेलना; भाजपा आमदार राम सातपुते संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:48 PM2022-02-04T14:48:22+5:302022-02-04T14:50:15+5:30
वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा अशा शब्दात आमदार राम सातपुतेंनी सरकारला फटकारलं आहे.
मुंबई - फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं मत मागून, इथल्या वंचित शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आज दलितांवर पाण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ आणली आहे. अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातल्या दलित बहूल वॉर्डात महिनाभरापासून पाणी नाही. गावातील सरपंचांनी हेतूपूरस्पर पाण्याचे कनेक्शन तोडले आहे असा आरोप भाजपा आमदार राम सातपुतेंनी केला.
राम सातपुते म्हणाले की, जीवघेण्या थंडीत आमच्या आई बहिणी गावच्या वेशीवर ठिय्या बसल्या होत्या. अनेकांनी गाव सोडून दिलंय. हा फक्त पाण्याचा पुरता विषय नाही. हा सरळ सरळ तुम्ही सामाजिक बहिष्कार घालत आहात. हा मोठा गुन्हा आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेनी या प्रकरणाची दखल घेत समिती स्थापन करून तातडीने चौकशीचे आदेश दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
तसेच वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा. मा. धननंजय मुंडे हा भोंगळ प्रकार कुणाच्या आशिर्वादानं सुरू आहे? आघाडीची सत्ता आली की दलित,वंचित, शोषित घटकावर अत्त्याचार वाढतात. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आता लवकरात लवकर संबंधित सरपंच, उपसरपंचावर कारवाई झाली पाहिजे असंही आमदार राम सातपुते म्हणाले.
आघाडीची सत्ता आली की दलित,शोषित घटकावर अत्त्याचार वाढतात.अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातल्या दलित बहूल वॉर्डात सरपंचांनी पाण्याचे कनेक्शन तोडले आहेत.हा सरळ सामाजिक बहिष्कार आहे.सामाजिक न्याय मंत्री @dhananjay_munde याची दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले पाहिजे. @Dev_Fadnavispic.twitter.com/74XEUHzro7
— Ram Satpute (@RamVSatpute) February 4, 2022
काय आहे प्रकार?
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावातील वार्ड क्रमांक १ मधील लोकांना पाण्यासाठी गाव सोडावं लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या प्रभागात तब्बल २८ दिवसांपासून पाणीच येत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या विरोधात त्यांनी गावाच्या वेशीवर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. बुधवारी रात्रीपासून त्यांनी गावावर बहिष्कार टाकत आंदोलन सुरू केले आहे. गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होतोय. मात्र, मागास वर्गाची वस्ती असलेल्या वॉर्ड १ मध्ये ग्रामपंचायतीकडून सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप महिलांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
तक्रारीनुसार, सावंगी मग्रापूर येथील वॉर्ड १ मध्ये ९० टक्के दलित बांधव राहतात. तथापी, बोटावर मोजता येईल एवढ्यांकडे नळ आहेत. अनेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे, ग्रामस्थांनी नळ कनेक्शनसाठीची मागणी केली. वेळोवेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार, पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी यांच्यासमोर समस्या मांडल्या; मात्र कोणीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यातच २८ दिवसांपासून वार्डातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद झाला. याबाबत विचारणा करण्यास गेल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.