वन्यप्राण्यांकडून २८ जणांचा मृत्यू
By admin | Published: February 25, 2015 11:59 PM2015-02-25T23:59:45+5:302015-02-26T00:10:18+5:30
पाच जिल्ह्यांतील आकडेवारी : सन २००४ पासून कोल्हापूर विभागात ८० जण जखमी
गेल्या दहा वर्षांपासून हत्ती, बिबट्या, गवे अशा वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसाहतीकडे वाढतो आहे. रविवारी (दि. २२) राधानगरी तालुक्यात हत्तीने एका शेतकऱ्याला सोंडेत पकडून आपटले. त्यामध्ये तो जखमी शेतकरी मृत्यूूशी झुंज देत आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य असा टोकाचा संघर्ष ऐरणीवर आला आहे. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कितीजणांना जीव गमवावा लागला, वन विभागाकडून कितीजणांवर गुन्हे दाखल केले, नुकसानभरपाई किती नाममात्र आहे, या अंगाने वेध घेणारी मालिका आजपासून...
भीमगोंडा देसाई-कोल्हापूर
कोल्हापूर वन विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत २००४ पासून आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २८ जणांना जीव गमवावा लागला. एकूण ८० जण जखमी झाले. मृतांपैकी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १३ जणांना हत्तीने चिरडले आहे. उर्वरितांचा मृत्यू गवा, बिबट्या यांच्या हल्ल्यांत झाला आहे. अजूनही त्यांचा उपद्रव सुरूच आहे.
विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड होत आहे. स्वार्थासाठी जंगलांवर अतिक्रमण वाढते आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये जंगलांना आगी लावल्या जात आहेत. पर्यटनासाठी जंगलात घुसखोरी होत आहे. जंगले विरळ होत आहेत. या महत्त्वाच्या कारणांमुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थानेच उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी हत्तींसह वन्य प्राण्यांनी मानवी वसाहतींकडे मोर्चा वळविला आहे.
विभागातील या पाच जिल्ह्यांत सन २००४ पासून वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे अधिक वाढला. पूर्वी सर्कशीमध्ये पाहावे लागणारे हत्ती गावामध्ये घुसू लागले. शेतकऱ्यांना त्यांचे सहज दर्शन होऊ लागले. जंगलाशेजारील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. कोणत्याही क्षणी हत्ती, बिबट्या, गव्याचा हल्ला होऊ शकत असल्यामुळे त्यांचे जगणेच भयकंपित झाले आहे.
हल्ल्याच्या भीतीने जंगलालगत असलेल्या शेकडो एकर जमिनी कसणे शेतकऱ्यांनी बंद करून त्या पडिकच ठेवणे पसंत केले आहे. वन्य प्राण्यांना पूर्णपणे रोखण्यात वन विभागाला यश आलेले नाही. हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहांपैकी आठजणांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली आहे. एका मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस उपलब्ध नसल्याने भरपाई दिलेली नाही. आॅगस्ट २००६ मध्ये राधानगरी अभयारण्यामध्ये तस्कराच्या हल्ल्यात मृत झालेल्या वनमजुराच्या वारसांना वन्यजीव विभागाकडून दोन लाख देण्यात आले आहेत. जखमी २३ जणांना ६ लाख ७० हजार रुपये भरपाई देण्यात आली आहे. (क्रमश:)
दोन जिल्ह्यांतील स्थिती
सन २००४ पासून २०१४ अखेर हत्तींच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी या तालुक्यांतील पाचजणांचा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी या भागांतील आठजणांचा मृत्यू झाला आहे.
सन २०१० पासून आतापर्यंत बिबट्या, गवा अशा वन्यप्राण्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील ११, सातारा जिल्ह्यातील दोन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
वन्य प्राणी
मानव संघर्ष
भाग १